

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे आणि मलनिस्सारण केंद्राच्या दुरवस्थेबाबत पुरवणी मागण्यांद्वारे मुख्यमंत्र्यांचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यात प्रामुख्याने नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थात शहरातील खड्डे आणि शहरातील मलनिस्सारण केंद्रांच्या वाहिन्यांचा मुद्दा गाजला.
पुरवणी मागण्यांवरील बोलताना आमदार फरांदे म्हणाल्या की, नाशकात सिंहस्थ भरणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून शासनाने विविध कामांसाठी एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात विविध विभागाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. परंतु एक हजार कोटी रुपये निधी त्या कामांसाठी अपुरा पडणार आहे. त्यामुळे निधीत वाढ होणे गरजेचे आहे.
नाशिक शहरातील सर्व सिव्हेज ट्रीटमेंट प्लांटचे म्हणजेच एसटीपी किंवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अपग्रेडेशन करत आहोत. त्यातील मलवाहिका ४० वर्षे जुन्या झाल्या आहेत. फुटलेल्या आहेत. त्यामुळे मूळ वाहिन्या बदलणे महत्त्वाचे आहे. त्यातले दूषित पाणी गोदावरी आणि नंदिनी नदीत मिसळते. यामुळे नद्यांसह भाविकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या नद्यांमध्ये मिसळणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सिंहस्थाच्या आराखड्यात या कामाचा समावेश व्हावा. त्यासाठी १,१०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी व गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी मुख्यमंत्री आणि नगरविकासाला विनंतीही त्यांनी यावेळी केली. नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे विणले आहे. त्यासाठी कोट्यवधींची कामे मंजूर झाली आहेत. असे सांगण्यात आले. मात्र सिंहस्थात येणारे भाविक त्र्यंबकेश्वरला जातील. तसेच सप्तशृंग गडावरही आदिमायेच्या दर्शनासाठी जाणार. त्यामुळे हा रस्ता एममधून वगळून नाशिक ते वणी रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे यानिमिताने केली.
शहरात अनेक ठिकाणी खड्डे असून त्यांच्या दुरुस्तीसाठी १,५०० कोंटींचे बजेट नगरविकास विभागाला दिले आहे. मात्र, रस्ते आणि पुलांंच्या दुरुस्तीसाठी नाशिक शहराला आणखी ५०० कोटींचा निधी आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.