Nashik Godavari River | गोदावरीत मैला सोडण्याचे पाप थांबवा!

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा : दैनिक 'पुढारी' कार्यालयास सदिच्छा भेट
State Food, Civil and Consumer Protection Minister Chhagan Bhujbal
राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : रस्ते, उड्डाणपुलांची उभारणी म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा नव्हे. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येथील विस्तीर्ण रस्ते, विकासकामे बघण्यासाठी येणार नाहीत. ते पवित्र गोदावरीत कुंभस्नानासाठी येतील. त्यामुळे गोदावरी नदी स्वच्छ करणे हेच आपले पहिले कर्तव्य असायला हवे.

Summary

दुर्दैवाने महापालिकेची मलनिस्सारण केंद्रे राजकीय लोकांमार्फत चालविली जात असल्याने अधिक नफ्यासाठी प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते, असे नमूद करत गोदावरीत मैला सोडण्याचे हे पाप थांबवा असा इशारा राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. गोदावरी स्वच्छ झाली, तरी सिंहस्थ यशस्वीरीत्या पार पडेल, असा दावाही भुजबळ यांनी केला

मंत्री भुजबळ यांनी शनिवारी (दि. २१) दैनिक 'पुढारी' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. निवासी संपादक राहुल रनाळकर, ब्यूरो मॅनेजर राजेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भुजबळ यांनी नाशिकच्या विकासावर दिलखुलास चर्चा केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करताना गोदावरीत मैला सोडणे बंद करा, ही आपली एकमेव मागणी असल्याचे भुजबळ म्हणाले. आपण नाशिकचे पालकमंत्री असताना तसेच समीर भुजबळ खासदार असताना, नाशिकच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले. त्याचाच परिपाक म्हणून मंत्रभूमी असलेले नाशिक यंत्रभूमी, शैक्षणिक हब आणि आता मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण केली, तरी कुंभमेळ्यात मदत होणार आहे. आता गोदावरी स्वच्छता हेच एकमेव ध्येय शासकीय यंत्रणांचे असायला हवे, असे भुजबळ म्हणाले. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपला गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. गेल्या तीन- चार दिवसांत हे घडलेले नाही, अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची तूर्त शक्यता नाही

भाजपसमवेत जाणाऱ्यांना आपण कदापि सोबत घेणार नाही, असे वक्तव्य करत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासंदर्भात भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, पवार साहेबांची एक विचारसरणी आहे. ती त्यांना सोडायची नाही. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तूर्त दिसत नाही. शिवसेना (उबाठा) व मनसे युतीचेही प्रयत्न सुरू आहेत. माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.

Nashik Latest News

मुंबई, पुण्यासारखे नाशिक नको!

मुंबई, पुण्याच्या विकासाने सर्वांना भुरळ घातली असली, तरी मुंबई, पुण्यासारखे नाशिक व्हावे, असे मला वाटत नाही. जेथे माणूस माणसाला ओळखत नाही, असा विकास कशाला हवा? नाशिकचे नाशिकपण टिकले पाहिजे. गगनचुंबी इमारतींची व्हर्टिकल डेव्हलपमेंट नको. शहराचा होरिझोंटल अर्थात समान विकास व्हायला हवा. मोठे उड्डाणपूल, स्कायवॉकसारख्या प्रकल्पांनी नाशिकची स्कायलाइन बिघडायला नको, अशी भूमिकाही भुजबळ यांनी व्यक्त केली.

जि.प.च्या नूतन इमारतीचे दीड महिन्यात उद‌्घाटन

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची आज पाहणी केली. दीड महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद‌्घाटन केले जाईल. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत सिंहस्थ प्राधिकरणाचे कार्यालय स्थापन केले जाईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. जोपर्यंत प्राधिकरणाला जागा मिळत नाही, तोपर्यंत सिंहस्थकामांना वेग येणार कसा, असा सवालही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news