

Godavari danger level
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सावंगी, धारासुर, खळी, दुसलगाव, भांबरवाडी, महातपुरी, झोला, पिंपरी, नागठाणा, मसला, सायाळा, सुनेगाव, मुळी व धारखेड या गावांना धोका निर्माण झाला आहे.
खळी, धारासुर, सायाळा व सुनेगाव या गावांचा संपर्क तुटला असून मुळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगाखेडच्या धारखेड पुलालाही पाणी लागले आहे. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी बचाव पथके स्थापन करून पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाहणी केली. नागरिकांनी नदीपात्रालगत न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, माजलगाव व जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून इंद्रायणी नदी काटोकाठ भरून वाहत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बॅक वॉटरमुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सायंकाळी पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.