

नाशिक : रामकुंड परिसर, गोदावरी नदी व तिच्या उपनद्या या धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असताना सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामे, सिमेंट काँक्रिटीकरण, अतिक्रमणे आणि प्रदूषणामुळे या परिसराचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप नाशिक बचाव संघटनेने केला आहे. रामकुंड परिसरातील नदीपात्र, पूररेषा आणि उपनद्यांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांवर तत्काळ बंदी घालावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने राजेंद्र बागूल आणि जयेश पोकळे यांनी दिला आहे.
संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरण, नदीपात्र अरुंद करणे, ऐतिहासिक घाटांचे नुकसान, मंदिर परिसरातील अडथळे निर्माण करणारी कामे सुरू आहेत. विशेषतः अहिल्यादेवी पुलाखालील वॉटर गेट प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तसेच गोदावरीला मिळणाऱ्या आणि नंदिनी आदी उपनद्यांचे नैसर्गिक संगम गटारांच्या पाइपद्वारे वळवले जात असल्याने नदी परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. नदीपात्रात साचणारे सांडपाणी आणि कचरा यामुळे प्रक्षण वाढत असून, जैवविविधता धोक्यात येत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नाशिक बचावच्या प्रमुख मागण्या
रामकुंड परिसरातील नदीपात्र, पूररेषा व नदीलगत सुरू असलेली सर्व बेकायदेशीर बांधकामे आणि सिमेंट काँक्रिटीकरण तत्काळ बंद करावे. नदीपात्र व पूरक्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटवून नदी मोकळी करावी. गोदावरी नदी व तिच्या सर्व उपनद्यांचा नैसर्गिक प्रवाह, मूळ रुंदी आणि खोली पुनर्स्थापित करावी. ऐतिहासिक घाट, मंदिरे व सांस्कृतिक वारसा संरक्षित करण्यासाठी स्वतंत्र संवर्धन आराखडा तयार करावा. नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणीय तपासणी कडक करावी.