

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):
नाशिकच्या जुनी सिडको परिसरातील ठाकरे उद्यानात जर्मनीतील नागरिकांकडून शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले जात असून, या अनोख्या उपक्रमामुळे स्थानिकांसह युद्धकलाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवीर संघाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात असून, जर्मनीमध्ये वस्तीस असलेले दांपत्य आणि त्यांची मैत्रीण विशेषतः नाशिकमध्ये येऊन हे प्रशिक्षण पूर्ण करत आहेत.
मिथिला रत्नाकर घुगे या मूळच्या जेलरोड येथील असून, त्या जर्मनीतील बर्लिन येथे नोकरीनिमित्त वास्तवास आहेत. त्यांचा विवाह बर्लिनमधील रोलैंड वुल्फ यागो यांच्याशी झाला आहे. त्यांच्यासोबत बर्लिनमधील त्यांची मैत्रीण नुरुल उलिंखेही नाशिकमध्ये आल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या दांपत्याने शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रवीर संघाचे नाशिक जिल्हाप्रमुख पवन माळवे यांची माहिती मिळाली आणि त्यांनी संपर्क साधला. जुनी सिडको येथील ठाकरे उद्यानात पवन माळवे व प्रशिक्षक गजानन अस्मर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी आणि संध्याकाळी लाठी, काठी, ढाल, तलवार, दंडपटा, भाला आणि बाण अशा पारंपरिक शस्त्रांच्या वापराचे १४ दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. परदेशातील नागरिकांनी आपल्या संस्कृतीची आणि शिवकालीन वारशाची घेतलेली ही दखल शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
"ठाकरे उद्यानात सर्वत्र पालापाचोळा पडलेला आहे. धुळीचे साम्राज्य आहे. मनपाने ठाकरे उद्यानात योग्य सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे."
- विजय कपिले, पदाधिकारी, वॉर्कर ग्रुप
"माझ्या पत्नीमुळे मलाही या कलेची आवड निर्माण झाली. पारंपरिक भारतीय युद्धकला शिकताना वेगळा अनुभव आणि आनंद मिळत आहे."
- रोलैंड वुल्फ यागो, बर्लिन
"शिवकालीन युद्धकला शिकण्याची मला नेहमीच आवड होती. बर्लिनमध्ये प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. मात्र नाशिकमध्ये या कलेचे सखोल प्रशिक्षण मिळत असल्याचा आनंद आहे. आम्ही मनापासून हे प्रशिक्षण पूर्ण करत आहोत."
- मिथिला घुगे