GEN Z ने केंद्र सरकारला झुकायला भाग पाडले!

Gen Z Protest | एकेकाळी तरुणाईबद्दल एक ठरलेला समज होता. ही पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, सोशल मीडियात रमलेली आहे, तिला समाज, देश, राजकारण किंवा लोकशाहीशी काही देणेघेणे नाही.
CJP Protest Delhi
CJP Protest DelhiPudhari
Published on
Updated on

डॉ. राहुल रनाळकर

(सह्याद्रीचा माथा)

एकेकाळी तरुणाईबद्दल एक ठरलेला समज होता. ही पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, सोशल मीडियात रमलेली आहे, तिला समाज, देश, राजकारण किंवा लोकशाहीशी काही देणेघेणे नाही. पण गेल्या काही वर्षांत हा समज एकामागून एक खोटा ठरत आहे. जगभरात आणि भारतातही तरुणाईने दाखवून दिले आहे की, ती फक्त सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारी पिढी नाही; गरज पडली तर रस्त्यावर उतरून संतेला प्रश्न विचारण्याची ताकदही तिच्यात आहे.

CJP Protest Delhi
Nashik earthquake update : दिंडोरी तालुक्यासह वणी परिसरात सलग दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अलीकडील युवकांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले. सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. सोशल मीडियावरील काही पोस्ट, काही व्हिडिओ आणि काही हॅशटॅग एवढ्यापुरती ही लाट मर्यादित राहील, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी, युवक आणि तरुण व्यावसायिक एका प्रश्नावर एकत्र आले. सोशल मीडियावर सुरू झालेला आवाज रस्त्यावर उतरला आणि सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली.

ही घटना केवळ एका आंदोलनाची कथा नाही. हा बदलत्या भारताचा चेहरा आहे. हा त्या पिढीचा उदय आहे, जी कोणत्या ही राजकीय पक्षाची कायमस्वरूपी समर्थक नाही आणि कोणत्या ही नेत्याची अंधभक्तही नाही. ती प्रश्न विचारते. उत्तर मागते. आणि समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची तयारी ठेवते. या पिढीला काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील एका निरीक्षणाच्या संदर्भात 'कॉकरोच' अशी उपमा देण्यात आल्याची चर्चा देशभर रंगली होती. त्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

CJP Protest Delhi
Nashik earthquake update : दिंडोरी तालुक्यासह वणी परिसरात सलग दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अनेक तरुणांनी या वक्तव्याचा निषेध केला. काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाखो युवक एकत्र आले. तेव्हाच लक्षात आले की, सोशल मीडिया हा आता केवळ मनोरंजनाचा मंच राहिलेला नाही; तो जनमत घडविण्याचे प्रभावी माध्यम बनला आहे.

आजचा युवक वृत्तपत्र वाचतो, पण त्याबरोबर तो रील्सही पाहतो. तो संसदेतील चर्चाही ऐकतो आणि यूट्यूबवरील विश्लेषणही पाहतो. एका क्लिकवर जगभरातील माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे माहिती लपविण्याचे दिवस संपले आहेत. सरकार, विरोधक, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यम - प्रत्येकावर त्याची नजर आहे.

सध्याची पिढी ही 'जेन- झी' म्हणून जगभर ओळखली जाते. या पिढीचं वागणं- बोलणं वेगळ्या थाटणीचं आहे. जगभरात भल्या भल्यांना गुडघे टेकायला या पिढीने भाग पाडले आहे. त्यात आता केंद्र सरकारमध्ये स्थापित मोदी सरकारचाही समावेश झालेला आहे. शेतकरी आंदोलनाप्रमाणे यावेळेच युवा पिढीचं आंदोलन चिरडून टाकण्याचे मनसुबे सरकारचे उधडले तर गेलेच पण या आंदोलकांच्या सगळ्या मागण्याही सरकारला मान्य कराव्या लागल्या.

युवा पिढीच्या रूपाने सरकारविरुद्धचा असंतोष बाहेर पडत असल्याच्या प्रतिक्रिया सगळ्या समाजमाध्यमांवर उमटल्या. उत्तरदायित्वाची भावना सरकारला पुढच्या काळात ठेवावी लागेल, हे स्पष्ट आहे. कोरी पाटी असलेल्या या युवा पिढीच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून झाले. पण त्याविरुद्धही युवा शक्ती पुरून उरली.

युवकांच्या आंदोलनामागे अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले. विदेशी निधी, विरोधी पक्षांचा हात, कटकारस्थान, समाजविघातक शक्ती अशा अनेक चर्चा रंगल्या. परंतु या चर्चांमुळे एक मूलभूत प्रश्न झाकोळला गेला. इतक्या मोठ्या संख्येने युवक रस्त्यावर का उतरले? त्यांना नेमके काय खटकत होते? त्यांच्या असंतोषाची मुळे कोणती होती? कोणत्याही लोकशाहीत हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असतो.

लोकशाहीमध्ये आंदोलन दडपण्यापेक्षा आंदोलन का उभे राहिले, हे समजून घेणे अधिक आवश्यक असते. कारण प्रत्येक आंदोलनामागे काही ना काही सामाजिक किंवा प्रशासकीय अस्वस्थता दडलेली असते. ती वेळेत समजून घेतली, तर संघर्ष टाळता येतो. अन्यथा तो अधिक व्यापक स्वरूप धारण करतो.

या आंदोलनाच्या काळात सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. एका पोस्टने हजारो लोक जोडले गेले. एका व्हिडिओने लाखो लोकांची मते बदलली. काही तासांत देशभरात आंदोलनाचा संदेश पोहोचला. पारंपारिक संघटनांना ज्या कामासाठी महिने लागत होते, ते आज काही तासांत घडू लागले आहे. ही डिजिटल क्रांती आहे आणि तिचा परिणाम राजकारणावरही होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

सरकारसमोर आजचे सर्वांत मोठे आव्हान विरोधी पक्ष नाहीत. सर्वांत मोठे आव्हान म्हणजे उत्तरदायित्व. नागरिक आता प्रत्येक निर्णयाचे स्पष्टीकरण मागत आहेत. एखादा निर्णय का घेतला? कोणाच्या आधारावर घेतला? त्याचा परिणाम काय होणार? या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागणार आहेत. केवळ बहुमताच्या जोरावर निर्णय घेण्याचा काळ बदलत आहे. जनमताचा आदर हा प्रशासनाचा अविभाज्य भाग बनत आहे.

या आंदोलनाने विरोधी पक्षांनाही नवी ऊर्जा दिली. बऱ्याच काळापासून निष्क्रिय वाटणारे अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले. युवकांच्या प्रश्नांभोवती त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष हा संकेततःच महत्त्वाचा असतो. त्यामुळे या आंदोलनाने केवळ सरकारलाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच नव्याने विचार करण्यास भाग पाडले.

आजची तरुणाई नेत्यांच्या भाषणांपेक्षा त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवते. घोषणांपेक्षा अंमलबजावणी तिच्यासाठी महत्त्वाची आहे. ती रोजगार, शिक्षण, पारदर्शकता, भ्रष्टाचारामुक्त व्यवस्था, गुणवत्तापूर्ण संधी आणि सन्मानाची अपेक्षा करते. भावनिक मुद्दे काही काळ प्रभाव टाकू शकतात; पण आयुष्य घडविणारे प्रश्न शेवटी निर्णायक ठरतात.

म्हणूनच कोणतेही सरकार असो, त्याने युवकांना विरोधक म्हणून पाहू नये. त्यांच्याकडे राष्ट्राच्या भविष्याची ताकद म्हणून पाहिले पाहिजे. आंदोलन करणारा प्रत्येक युवक देशविरोधी असतो, असा निष्कर्ष लोकशाहीला शोभणारा नाही. उलट प्रश्न विचारणारा नागरिक लोकशाही अधिक मजबूत करतो. कारण प्रश्नांमुळेच उत्तरदायित्व निर्माण होते आणि उत्तरदायित्वामुळे शासन अधिक सक्षम बनते.

युवकांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांचा वेग. ही पिढी निर्णय पटकन घेते, पटकन संघटित होते आणि तितक्याच वेगाने मतही बदलते. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्यांना कायमस्वरूपी आपले मतदार समजू शकत नाही. जो त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरेल, त्याच्यासोबत ते उभे राहतील. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.

येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे आणि सोशल नेटवर्कस यांचा प्रभाव आणखी वाढणार आहे. प्रत्येक सरकारी निर्णय काही मिनिटांत देशभर चर्चेचा विषय बनेल. प्रत्येक चुकीचा निर्णय लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या निर्णयालाही तितकाच वेगाने जनसमर्थन मिळेल. त्यामुळे पारदर्शकता आणि संवाद ही शासनाची अपरिहार्यता ठरणार आहे.

CJP Protest Delhi
Nashik crime: नितीन जाधव यांची आत्महत्या की, घातपात?

या आंदोलनाने एक संदेश स्पष्ट दिला आहे, लोकशाहीमध्ये आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत. ते अधिक तीव्र होतात. संवाद, विश्वास आणि उत्तरदायित्व यांच्याशिवाय कोणतेही सरकार दीर्घकाळ जनतेचा विश्वास टिकवू शकत नाही. भारत हा जगातील सर्वांत तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग युवकांचा आहे. त्यामुळे ही पिढी केवळ भविष्यातील मतदार नाही; ती आजची निर्णायक शक्ती आहे. तिच्या अपेक्षा समजून घेणारे सरकारच पुढील दशकात यशस्वी ठरेल.

आजचा निष्कर्ष साधा आहे, पण अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्ता बहुमताने मिळू शकते; परंतु ती टिकते जनविश्वासावर. आणि जनविश्वास टिकवायचा असेल, तर युवकांचे प्रश्न ऐकावेच लागतील. कारण आता देश बदलत आहे, राजकारण बदलत आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारताची युवा शक्ती स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहे. सरकारे बहुमताने चालतात; पण लोकशाही जनमतावर टिकते. आणि जनमताचा सर्वांत बुलंद आवाज आज भारतातील युवा शक्ती बनली आहे, हे स्पष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news