नाशिक : मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे गंगापूर धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे पुन्हा 1,235 क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून 603 क्यूसेकने विसर्ग सुरू होता त्यात वाढ करण्यात आली. विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरी पुन्हा खळाळली आहे. सध्या गोदाकाठावरील सांडव्यांवरून पाणी वाहात आहे. त्यामुळे नाशिककर गोदेच्या पाण्यात चिंब होण्याचा आनंद घेत आहेत.
श्रावणमास असल्याने ऊन- पावसाचा लपंडाव सुरू असून, हलक्या आणि मध्यम सरी कायम आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा 74 टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला होता. 8 जुलैला विसर्ग 3,969 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला.
मात्र त्यानंतर पावसाच्या प्रमाणात घट झाल्यामुळे विसर्गही कमी करण्यात आला होता. दि. 11 जुलैला विसर्ग बंद करण्यात आला होता. तेव्हापासून 17 दिवस विसर्ग बंद होता. दि. 11 जुलैनंतर 12 दिवस पावसानेही विश्रांती घेतली होती मात्र त्यानंतर पुन्हा हलक्या आणि मध्यम पावसाला सुरुवात झाली. दि. 23 जुलैपासून आजपावेतो काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिक़ाणी मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पुन्हा एकदा धरणपातळी वाढत आहे. सध्या धरणांत 71 ट़क्के जलसाठा आहे. मात्र पाटबंधारे खात्याकडून विसर्गचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सध्या 1,235 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास धरणातून विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. या हंगामात गोदावरील 5 वेळा पूर येऊन गेला आहे, तर 3 वेळा दुतोंड्या मारुती छातीपर्यंत पुराच्या पाण्यात बुडाला. अद्यापही पावसाचे 2 महिने शिल्लक असल्यामुळे पुढील काळात पावसाचा जोर वाढू शकतो.
सध्या 1,235 क्यूसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे गोदामाई खळाळली असली, तरी नदीकाठचे जीवन सध्या सामान्य आहे. दरररोजप्रमाणे नदीकाठी भाजीपाल्यासह इतर वस्तूंचा बाजार भरत असून, भाविकही देवस्थानांना भेटी देत आहेत. पार्किंग फुल्ल असून धार्मिक विधीही होत आहेत.
मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी ढगाळ हवामान कायम आहे. हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असल्यामुळे नाशिककर सुखावले आहेत. श्रावणमास असल्यामुळे ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे.