Nashik Water Supply Gangapur Dam | नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

Nashik Water Supply Gangapur Dam | रिपरिप पावसामुळे पुन्हा खळाळली गोदामाई
Nashik Water Supply Gangapur Dam
Nashik Water Supply Gangapur Dam
Published on
Updated on
Summary
  • गंगापूर धरण समूह ७६.८९ टक्के

  • शहरात बरसल्या दिवसभर सरींवर सरी

  • आज यलो अलर्ट, दमदार पावसाचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्याची प्रमुख जीवनवाहिनी असलेल्या गंगापूर धरण समूहात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहराच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या संततधारामुळे गंगापूर, कश्यपी आणि गौतमी या तीन धरणांच्या समूहात एकूण ७,१८२ दशलक्ष घनफूट (एमसीएमएफटी) पाणीसाठा झाला असून, हा समूह ७६.८९ टक्के भरला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७१.७७ टक्के होता. त्यामुळे यंदा सुमारे पाच टक्क्यांनी अधिक पाणी उपलब्ध झाले आहे.

Nashik Water Supply Gangapur Dam
Doctor Murder Case | "डॉक्टरच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अन् स्वयंपाक्याचा जामीन फेटाळला!; दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय"

गंगापूर धरणात सर्वाधिक सुधारणा दिसून आली आहे. ५६३० एमसीएफटी क्षमतेच्या या धरणात सध्या ४,४८३ एमसीएफटी (७९.६३ टक्के) पाणी असून गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गौतमी धरणात १९.७६ टक्के भरले असून ते पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मात्र कश्यपी धरणात केवळ ५३.५६ टक्के साठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत येथे पाणी कमी आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धारणा धरणात ६६.२६ टक्के साठा असून, मुकणे धरणात मात्र केवळ ३५.३६ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मुकणे धरणातील साठ्याकडे मनपाचे विशेष लक्ष राहणार आहे. एकूणच, गंगापूर धरण समूहातील वाढलेला पाणीसाठा नाशिककरांसाठी दिलासादायक ठरला असून, आगामी काळात शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी ही स्थिती अनुकूल मानली जात आहे.

५८४८ दशलक्ष पाणीआरक्षणाचा वापर

मनपाने १५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी ६४०० एमसीएफटी पाण्याचे आरक्षण केले होते. त्यापैकी २१ जुलैपर्यंत ५८४८.३२ एमसीएफटी पाणी वापरण्यात आले असून गंगापूरमधून ४,१७१.२२, दारणाधरणातून २४९.५४ आणि मुकणेधरणात १,४२५.९५ एमसीएफटी पाणी उपलब्ध होत आले आहे. शहराचा सरासरी दैनंदिन पाणीवापर २०.८९ एमसीएफटी, म्हणजेच ४९१.५२ एमएलडी इतका नोंदवण्यात आला आहे.

दारणा धरणातून ५५० क्यूसेकने विसर्ग सुरू

दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून बुधवारी (दि. २२) सकाळी ११ पासून दारणा धरणातून दारणा नदीपात्रात ५५० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ स्तरावरील निर्णयानुसार हा विसर्ग करण्यात आला असून, पुढील काळात धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर दारणा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीच्या प्रवाहात जाऊ नये, तसेच पशुधन, शेतीची अवजारे, पंप व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन केले आहे. तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

गंगापूर धरणातून १९९ क्यूसेक विसर्ग

गंगापूर धरणातून बुधवारी (दि. २२) दुपारी ३ पासून १९९ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील काळात पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात वाढ अथवा बदल होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.

नदीपात्रात तसेच पूरप्रवण भागात विनाकारण प्रवेश करू नये, जनावरे किंवा साहित्य नदीकाठावर ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह संबंधित यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

Nashik Water Supply Gangapur Dam
CM Pramod Sawant |"नीती आयोगाचा गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 जाहीर! मोठ्या राज्यांमध्ये गोवा चौथ्या तर लहान राज्यांत पहिल्या स्थानावर"

रिपरिप पावसामुळे पुन्हा खळाळली गोदामाई

मागील दोन आठवड्यांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, बुधवारी (दि. २२) दिवसभर सरार्विर सरी बरसल्याने, गोदामाई पुन्हा एकदा खळाळली आहे. ८ जुलै रोजी गोदावरी नदीला हंगामातील पहिला पूर आला होता. गंगापूर धरणातून एक थेंबही पाणी न सोडता हा पूर आला अन् काही तासांत ओसरलादेखील होता. बुधवारीदेखील पाणलोट क्षेत्रातील पाणी गोदापात्रात आल्याने, गोदावरी खळाळून वाहिली. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवारी (दि. २३) नाशिकला यलो अलर्ट दिल्याने, दमदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने ६ जुलै रोजी नाशिकला ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर संपूर्ण श्रावण ऑलमोस्ट कोरडा गेला होता. मात्र, नाशिकवरील हे संकट टळल्याने, यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, ७ आणि ८ जुलै रोजी नाशिकला दमदार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे गोदावरीला ८ जुलै रोजी मोठा पूर आला होता.

पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आले होते. दरम्यान, त्यानंतर पावसाने उघडीप घेतल्याने, नाशिककरांची चिंता वाढली होती. जिल्ह्यात पेरण्यांची वेग धरताच, पाऊस गायब झाल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता. दरम्यान, बुधवारी (दि. २२) पुन्हा एकदा पाऊस जिल्हाभर सक्रिय झाल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री आणि दिवसभर पावसाने रिपरिप हजेरी लावली.

पाणलोट क्षेत्रातील पाणी मोठ्या प्रमाणात गोदापात्रात आल्याने, रामकुंडावर पाण्याचे प्रवाह वेगाने वाहू लागले. गांधी तलाव व परिसरातील मंदिरांमध्ये पाणी शिरल्याने, गोदामाई पुन्हा एकदा खळाळून वाहताना दिसली. हवामान विभागाने नाशिकला गुरुवारी यलो अलर्ट दिला असून, तसेच ढगांच्या गडगडाटासह पाऊस, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, पाऊस सक्रिय झाला असला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने, बळीराजाची चिंता कायम आहे.

घाटामाथा परिसराला आज ऑरेंज अलर्ट

नाशिकमध्ये रिमझिम पावसाने सुरुवात केली असली तरी, नाशिकच्या घाटामाथा परिसरासाठी हवामान विभागाने बुधवारी (दि. २२) रेड अलर्ट दिला होता. तर गुरुवारी (दि. २३) ऑरेंज अलर्ट दिला असून, शुक्रवारी (दि. २४) यलो अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरात दमदार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने, पुन्हा एकदा जिल्ह्यातील नदी-नाले खळाळून वाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आठवडे बाजार भरला, पण...

गोदावरी हंगामातील पहिला पूर बुधवारी (दि. ८) आला होता. त्यामुळे आठवडे बाजार भरविता आला नव्हता. यावेळीदेखील बुधवारीच गोदावरी खळाळली. गोदामाई दोन्ही पात्रं भरून वाहत असली तरी, आठवडे बाजाराची जागा मोकळी असल्याने, विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मात्र, प्रशासनाने खबरदारी म्हणून विक्रेत्यांना इशारा दिला होता. गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास, तत्काळ दुकाने हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

गंगापूर धरणातून विसर्ग

रिपरिप पावसामुळे समूहात ७६.८९ टक्के पाणीसाठा झाल्याने, बुधवारी हंगामात पहिल्यांदाच विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरण ७९.६३ टक्के इतके भरले असून, बुधवारी धरणातून दुपारी ३ च्या सुमारास १९९ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. याशिवाय कादवा (१५५४), भावली (१५०९), पालखेड (१३७४), पुणेगाव (७०२), वालदेवी (३५), दारणा (११००), गौतमी गोदावरी (१०००) असा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नांदूर मध्यमेश्वर धरणातून ७ हजार ९२४ ने विसर्ग सुरू आहे.

Nashik Water Supply Gangapur Dam
Goa Tribal Vision | उतोर्डा येथे आज 'गोवा ट्रायबल व्हिजन 2037' परिषद

फरशी पुलावरून बैल गेला वाहून

सुरगाणा तालुक्यातील खिर्डी ते माटी गावांना जोडणाऱ्या फरशी पुलाला मुसळधार पावसामुळे मोठे भगदाड पडल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पुलाची अवस्था धोकादायक बनली आहे. ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूल आता अपघाताला आमंत्रण देत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. परिसरातील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात खिर्डी येथील शेतकरी रामदास लक्ष्मण डोळे यांचा बैल वाहून गेल्याची घटना घडली. त्यामुळे छोटे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

खिर्डी - माटी मार्ग हा परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, पुलावरील भगदाडामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात हा मार्ग अधिक धोकादायक बनला असून, वाहतुकीवरही परिणाम होत आहे. डोळे कुटुंबास शासनाने आर्थिक मदत द्यावी, भगदाड पडलेल्या पुलाची युद्धपातळीवर दुरुस्ती करत नागरिकांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news