

Ganeshotsav 2025 celebrations
नाशिक : गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळाल्यानंतर येऊ घातलेल्या पहिल्याच गणेशोत्सवात ढोल वादकांचा सराव अत्यंत टिपेला पोहोचला आहे. जिल्ह्यात गणरायाच्या आगमन मिरवणुकीसाठी यंदा ढोलपथकांनी अभिनव वादन संकल्पनांसह नवीन वाद्यांचाही समावेश केल्याने यंदा उत्सवात ढोलवादन तेच परंतु निनाद वेगळ्या पद्धतीने गुंजणार आहे.
ढोल वादनाशिवाय गणेशोत्सव पूर्णच होत नाही. नाशिकचा ढोल राज्यातच नव्हे तर देशात आणि विदेशातही आपल्या वादनाचा निनाद अखंडित ठेवत आहे. येत्या बुधवारी (दि.27) होणार्या गणरायाच्या आगमन मिरवणुकीसाठी ढोल वादकांचा सराव गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. जिल्ह्यात 40 पथकांमधील सुमारे 7.5 हजार वादक दररोज सराव करत आहेत.
यंदा वादन पथकात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, विशेषत: महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय वाढल्याची माहिती सहस्र नाद वादन पथकाच्या प्रतिनिधींनी दिली. या वर्षातील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचा त्रिशताब्दी सोहळा व अन्य काही वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब वादनात दिसणार आहे. आकर्षक गणवेशासह ढोलक, डफ, महाकाल झांज यांचाही समावेश वादनात काही पथकांद्वारे केला जाणार आहे.
ग्रुपमधील 325 वादक यंदा तब्बल नऊ नवीन ताल वाजवणार आहेेत. वादनाच्या अनुषंगाने नवीन ताल वादनात समाविष्ट केले आहे. चांदीच्या गणपतीसाठी यंदा बाबा खाटुश्याम दरबार संकल्पना आहे, त्यानुसार वादनातही अभिनव प्रयोग करणार आहोत. गणेशोत्सवांसह काही संस्थांसाठी स्थिर वादनाचेही नियोजन आहे.
अमी छेडा, प्रमुख, सहस्रनाद ढोलवादन पथक
गणेश प्रतिष्ठापना-पूर्व आगमन सोहळे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. वादक पथकांना गणेशस्थापनेपूर्वीच मोठी मागणी आहे. त्यामुळे वादकांमध्ये उदंड उत्साह दिसून येत आहे. मोठ्या गणेशमूर्ती बसवण्याकडेही मंडळांचा कल आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागही यंदा लक्षणीय आहे.
अथर्व शुक्ल, वादक, सहस्रनाद ढोलवादन पथक