

नाशिक : औद्योगिक, कृषी, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रांत झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे नाशिक जिल्ह्यात इंधनाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने इंधनाचा अखंड आणि सुरळीत पुरवठा कायम ठेवत ग्राहकांचा विश्वास मिळविला आहे. मजबूत पुरवठा साखळी, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था आणि विस्तृत रिटेल नेटवर्कच्या माध्यमातून बीपीसीएलकडून नाशिकमधील ग्राहक, उद्योग, वाहतूकदार आणि शेतकरी यांना सातत्याने सेवा पुरविण्यात येत आहे. शहर आणि परिसरात वाढती वाहनसंख्या, औद्योगिक विस्तार, कृषी क्षेत्रातील वाढत्या हालचाली तसेच पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.
मे २०२६ मध्ये बीपीसीएलच्या पेट्रोल विक्रीने ९,७४२.११ मेट्रिक टनांचा टप्पा गाठला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १७.१३ टक्के इतकी आहे. डिझेल विक्रीत आणखी मोठी वाढ नोंदविण्यात आली असून, ती १९, २०३.७२ मेट्रिक टनांवरून २४,८६७.६० मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे. यात तब्बल २९.४९ टक्के वाढ झाली आहे.
या आकडेवारीतून नाशिकमधील वाढते औद्योगिक उत्पादन, मालवाहतूक, बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकासाच्या कामांना वेग मिळाल्याचे स्पष्ट होते. याशिवाय कृषी क्षेत्रातही डिझेलचा वाढता वापर दिसत आहे. बीपीसीएलकडून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांसाठीही नियमित पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. मे २०२६ दरम्यान कंपनीने नाशिक विभागात ४ लाख ४६ हजार ३१ घरगुती एलपीजी सिलिंडर, १२ हजार ७२६ व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि ३ हजार २८१ एफटीएल सिलिंडरचा पुरवठा केला आहे.
बीपीसीएलच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकसह महाराष्ट्रातील सर्व पेट्रोलपंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही. वाढत्या आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी आणि नाशिकच्या विकासाला ऊर्जा पुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील बीपीसीएल (मे. टन)
मे २०२५ - ८,३१९.०९ मे २०२६ - ९,७४२.११ वाढ : १७.१३ टक्के
डिझेल विक्री (मे. टन)
मे २०२५ - १९,२०३.७२ मे २०२६ - २४,८६७.६० वाढ - २९.४९ टक्के
एलपीजी पुरवठा (मे २०२६) घरगुती सिलिंडर - ४,४६,०३१ व्यावसायिक सिलिंडर - १२,७२६ एफटीएल सिलिंडर - ३,२८१