

नाशिक : खुशी गोराडे
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही नाती जन्मापासून मिळतात; मात्र मैत्री हे असे नाते आहे, जे माणूस स्वत: निवडतो. विश्वास, समजूतदारपणा, साथ आणि परस्पर आदर या मूल्यांवर उभे असलेले हे नाते जीवनातील अनेक चढ-उतारांत आधार देत असते. याच मैत्रीचा सन्मानासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (दि. २) जगभरात मैत्री दिन साजरा केला जात आहे.
सध्या काळानुसार मैत्री व्यक्त करण्याच्या पद्धती काही प्रमाणात बदललेल्या असून, हस्तलिखित शुभेच्छापत्रे, फ्रेंड्सशिप बँडची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे; तरीही मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा आणि आठवणींना उजाळा देण्याचा आनंद कायम आहे.
मैत्री दिनानिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. फ्रेंड्सशिप बँड, शुभेच्छापत्रे, की-चेन, मग, चॉकलेट गिफ्ट पॅक आणि विविध भेटवस्तूंना मागणी वाढत आहे तसेच पिवळ्या गुलाबांनाही मैत्रीचे प्रतीक म्हणून विशेष पसंती मिळत असल्याचे दिसून आले.
यंदा मैत्री दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिटी सेंटर मॉलमध्ये सायंकाळी ४ ते ६ या वेळेत खेळ व मनोरंजनाचे उपक्रम होत आहेत. 'संडे डिनर विथ स्ट्रेंजर्स' या उपक्रमातून नव्या मैत्रीचे बंध जुळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गंगापूर रोड परिसरात मुलांसाठी फ्रेंड्सशिप बँड तयार करणे आणि कलाकुसरीचे विशेष उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
मैत्री दिन हा मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आयुष्यात सुख-दुःखात साथ देणारे मित्र असणे महत्त्वाचे आहे. माझ्या आयुष्यात असे मित्र आहेत, याचा मला आनंद वाटतो.
मैत्री दिनाला जीवलग मैत्रिणीबरोबरच्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मी कधीही ठरवून मैत्री केली नव्हती. ती नकळत जुळली आणि आज आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक झालेली आहे.
मैत्री म्हणजे विश्वास आणि कायमची साथ. चांगला मित्र प्रत्येक आनंदात सहभागी होतो आणि अडचणीच्या वेळीही खंबीरपणे उभा राहतो म्हणूनच आयुष्यात चांगले मित्र असणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
मैत्री म्हणजे फक्त मजा-मस्ती नाही, तर एकमेकांना समजून घेणे आणि गरज पडल्यावर साथ देणे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सोबत असणाऱ्या मित्रांमुळेच अनेक क्षण खास होतात. त्यामुळे मैत्री दिन हा या नात्याचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.