

नांदगाव (नाशिक) : नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीच्या डब्याची आठ चाके घसरल्याने काहीकाळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून मालगाडी बाजूला काढली आणि वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.
दौंडकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या डब्यांची आठ चाके शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास नांदगाव उड्डाणपुलाजवळ लोहमार्ग क्रॉसिंगदरम्यान घसरली. घटनेनंतर रेल्वे प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. या दरम्यान काही एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावल्या. नांदगाव, मनमाड, भुसावळ, चाळीसगाव आणि इगतपुरी येथे मालगाड्या व प्रवासी गाड्या सुमारे सव्वा तास थांबवाव्या लागल्या. मनमाड येथील अतिदक्षता विभागाच्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केल्याने रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तपास सुरू केला आहे.