सिन्नर : तालुक्यातील चास परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गोपालदरा येथील शेतकरी दगडू निवृत्ती खैरनार यांच्या गट नं. ९७ मधील उसाच्या शेतात तब्बल चार बिबट बछडे आढळून आली. त्यापैकी एक बछडा मृत अवस्थेत आढळला असून, उर्वरित तीन जिवंत आहेत. या पिल्लांचे वय अंदाजे २० ते २५ दिवसांचे असल्याचे वनविभागाने सांगितले.
सदर पिल्ले आढळल्याची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महेश वाघ, वनरक्षक आकाश रुपवते, वन्यजीव बचाव पथकातील रोहित लोणारे, निखिल वैद्य व इतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पिलांना सुरक्षित ताब्यात घेतले. मृत पिलाचा अंत्यविधी मोहदरी येथे करण्यात आला असून, तीन जिवंत पिलांना उपचारासाठी नाशिक येथील टी.टी.सी. केंद्रात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून चास परिसरात तीन ते चार बिबटे दिसून आल्याची माहिती असून, गेल्या आठवड्यात एका विहिरीत मृत बिबटाही आढळला होता. त्यामुळे चास परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मादी बिबट्याची भीती
या परिसरात बछडे आढळल्यामुळे त्यांच्या आईचा म्हणजेच मादी विवट्याचा वावर असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी, तसेच वनविभागाने परिसरात आवश्यक ते उपाययोजना करून रेस्क्यू ऑपरेशन राबवावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.