

Mother murdered by mentally ill son
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा आणि आपल्या वृद्ध आजारपणाने अंथरूणाला खिळलेल्या आईचा गळा आवळून मनोरुग्ण मुलाने खून केला. खुनानंतर त्याने थेट पोलिस ठाणे गाठत 'मला अटक करा, मी आईचा खून केला' असे सांगून आत्मसमर्पण केले. या प्रकाराने नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली.
जेलरोडच्या भगवा चौकाजवळ असलेल्या अष्टविनायकनगर येथे राहणाऱ्या यशोदाबाई मुरलीधर पाटील (८५) मंगळवारी रात्री घरात झोपलेल्या होत्या. त्या बऱ्याच काळापासून आजारी असल्यामुळे अंथरूणाला खिळून होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मनोरुग्ण मुलगा अरविंद ऊर्फ बाळू मुरलीधर पाटील (५७) हा राहतो. त्याच्या मानसिक आजाराला कंटाळून त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. यामुळे घरात आई व मुलगा हे दोघेच राहत होते.
यातच अरविंदने आईच्या आजाराला व वृद्धापकाळाला कंटाळून तिचा खून केल्याचे नाशिकरोड पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याला घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस पथकाला पलंगावर वृद्ध माता मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी अरविंदविरोधात गुन्हा दाखल करत न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने हा मुलगा खरच मनोरुग्ण आहे की नाही, याची तपासणी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.