

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळी परिस्थितीजन्य शास्त्रीय पुरावे संकलनासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची (फॉरेन्सिक) २१ पथके कार्यरत आहेत. नुकतेच शहर, ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात प्रत्येक एक नवीन फॉरेन्सिक वाहन दाखल झाल्याने, आता गुन्हे उघडकीस आणण्यात मोठी मदत होणार आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक विभागाकडील फॉरेन्सिक एक्स्पर्ट तसेच पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सध्याच्या अत्याधुनिक विज्ञान युगात गुन्हेगार अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करताना तपास यंत्रणेस बरेच अडथळे पार करून गुन्ह्यांची उकल करण्यात यश येते.
तसेच गुन्हा उघडकीस आल्यावरही तपासात आरोपींविरुद्ध ठोस पुरावे, शास्त्रीय पद्धतीचा वापर करून पुरावे संकलित न केल्यास गुन्हेगार सहीसलामत न्यायालयातून निर्दोष सुटतात. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणतही मोठ्या प्रमाणावर घसरण होत असते. पोलिस तपास पथकास गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्याच्या घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून घटनास्थळावर आढळून येणारे बारीक, सूक्ष्म पुरावे तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील रासायनिक तसेच जीवशास्त्र विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण आदी अनेक बाबींचा बारकाईने अभ्यास करून, तपासात पुराव्यांची साखळी जोडून, आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला पाठविण्यात येतो. त्यामुळे नव्या फॉरेन्सिक वाहनांची पोलिस पथकाला मोठी मदत होणार असून, गुन्हे निकाली काढण्यास गती मिळणार आहे.
वाहनात छायाचित्रकार व प्रशिक्षित कर्मचारी, तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील सहायक विश्लेषक असणार आहेत. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यास तसेच आरोपीविरुद्ध भौतिक, जैविक व वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी या वाहनाचा मोठा फायदा होणार आहे.
बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक