देवळाली कॅम्प लष्कराच्या तळावर बिबट्याने ठोकला ‘तळ’

नाशिक : प्रतिनिधी

देवळाली कॅम्प येथील लष्करी हद्दीतील रणगाड्यावर बिबट्याने मुक्काम ठोकल्याचे चार छायाचित्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अखेर रणगाड्यावरील बिबट्याचे फोटो हे देवळाली कॅम्प परिसरातील तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानावरील असल्याचा दुजोरा वनविभागाने दिला आहे.

देवळाली कॅम्प लष्करी हद्दीत देखाव्यासाठी ठेवण्यात आलेल्या रणगाड्यावर रात्री बिबट्याने बैठक मारत निद्रिस्त झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सर्वसामान्यांना प्रवेश नसणार्‍या प्रतिबंधित क्षेत्रातील फोटो सोशल मीडियावर आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मध्यरात्री रणगाड्यावर बसलेल्या बिबट्याची छबी कोणी टिपली? तसेच ती सोशल मीडियात कशी पोहोचली हे प्रश्‍न अनुत्तरितच आहे. 

सर्वच फोटोओळींमध्ये देवळाली कॅम्पचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. बिबट्याची आकर्षक रूबाबदार बैठक अन् निद्रिस्तावस्थेतील छबीने नागरिकांचे लक्ष वेधले नसले तर नवलच म्हणावे लागले. ही बाब वार्‍यासारखी पसरताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वनविभागाच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून सत्यता जाणून घेतली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनीही व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे माहिती जुळविण्यास सुरुवात केली. लष्करी अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून फोटोची शहानिशा करण्यात आली. अखेर लष्करी अधिकार्‍यांनीही व्हायरल फोटो शिंगवे बहुला शिवारातील भारतीय तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानालगत ठेवण्यात आलेल्या जुन्या रणगाड्यावरील असल्याचे शिक्कामोर्तब केले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान, लष्करी हद्दीत सुमारे 22 हजार एकरवर जंगल असून, तिथे बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news