

नाशिक / त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर गुरुवारी (दि. १५) धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या घोषात राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विविध आखाड्यांचे प्रमुख, साधू-संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते. गंगाआरतीने पूजन सोहळ्याची सांगता झाली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी, सुरक्षाव्यवस्था आणि विविध विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी यावेळी दिले.
सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कामांना गती देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, सहायक धर्मादाय आयुक्त विवेक सोनुने, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दातस, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी सानप, मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेते आणि नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, आखाड्यांचे प्रतिनिधी, साधू-संत, महंत, ग्रामस्थ उपस्थित होते.
ध्वजावर समुद्रमंथनातून प्राप्त रत्नांचे चित्रण
कुशावर्त तीर्थावर उभारण्यात आलेला ध्वजस्तंभ ३१ फूट उंच आहे. या ध्वजस्तंभावर समुद्रमंथनाची संकल्पना साकारण्यात आली असून, समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या रत्नांचे चित्रण ध्वजावर करण्यात आले आहे. ध्वजस्तंभाच्या खालच्या भागात श्री गणेशाची प्रतिमा, तर सर्वात वरच्या भागात अमृतकलश धारण केलेल्या गरुडाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. धार्मिक परंपरा, पौराणिक संदर्भ आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे अध्यात्मिक महत्त्व या कलाकृतीतून अधोरेखित करण्यात आले आहे.