

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नीलपर्वत भागातील काही धोकादायक भागात चर खोदून पाणीप्रवाह वळवण्यासह तत्काळ व दीर्घकालीन उपाययोजना जीएसआयच्या पथकाने सुचविल्या असून, यातील तत्काळ करण्याच्या उपाययोजनांसाठी जीएसआयचे पथक त्र्यंबकेश्वर भागात फेरसर्वेक्षण करणार आहे.
त्यावर अंतिम कारवाईसाठी प्राधिकरण राज्य व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचेही मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध १७ प्रकारच्या धोक्यांच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलन प्रतिबंध आणि भूकंपीय अभ्यासासाठी संयुक्त कृती आराखडा निश्चित केला आहे.
या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वरमध्ये पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे उभारून तीन महिन्यांचा सविस्तर भूकंपीय अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासातून परिसरातील भूकंपीय हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास होणार असून,
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचे नियोजन आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या अभ्यासासाठी आवश्यक जागा निश्चित करणे, 'जीएसआय'च्या अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था आणि इतर आवश्यक समन्वयाची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरण पार पाडणार आहे.
नाशिक जिल्ह्यात नुकताच झालेल्या भूकंपाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर 'जीएसआय'चे पथक त्र्यंबकेश्वर येथे तीन महिन्यांचा सविस्तर भूकंपीय अभ्यास करणार आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे उभारण्यात येणार असून, ऑगस्ट महिन्यात भूस्खलनप्रवण भागांचे फेरसर्वेक्षण 'जीएसआय' पथकामार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान कुंभमेळा प्राधिकरण व 'जीएसआय'चे पथक यामध्ये समन्वयासाठी एकच नोडल समन्वय व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलनप्रवण ठिकाणांचे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात फेरसर्वेक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या पाहणीच्या आधारे संवेदनशील स्थळांची निश्चिती करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. या बैठकीस 'जीएसआय' राज्य विभागाचे उपमहासंचालक डॉ. बिभास सेन, राज्य विभागाचे संचालक मेगो चासी, 'जीएसआय' नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक साबीर पठाण, भूभौतिकशास्त्रज्ञ अक्षय जोशी तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे उपस्थित होते.