

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर कारची तोडफोड करून गोळीबार करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत बसस्थानक परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवत पेंटिंग कामगाराला बेदम मारहाण करून रोख रक्कम लुटण्यात आली. दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिली घटना जाधव मळा येथील केवललक्ष्मी अपार्टमेंटमध्ये बुधवारी (दि. २९) मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास घडली. बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांच्या फिर्यादीनुसार, काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्या मर्सिडीज कारची दगडांनी तोडफोड केली.
जाधव खिडकीतून पाहात असल्याचे लक्षात येताच आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना बाहेर येण्याचे आव्हान दिले. ते बाहेर येताच भूषण गोसावी याने गावठी पिस्तुलातून जाधव यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने गोळी त्यांना न लागता कारच्या बोनेटला लागल्याने त्यांचा जीव वाचला. आरोपींनी परिसरातील नागरिकांनाही धमकावत दहशत निर्माण केली आणि स्कोडा कारमधून पसार झाले. याप्रकरणी उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत मंगळवारी (दि. २९) रात्री ११.३० च्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकाजवळील रिक्षा स्टँड परिसरात अफरोज अख्तर खान यांच्यावरही हल्ला करण्यात आला. स्कोडा कारमधून आलेल्या भूषण गोसावी, दानिश शेख, सुमित मोरे, सोनू शेख, मोनू शेख व अन्य साथीदारांनी परिसरात पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.
मध्यस्थी करण्यास गेलेल्या खान यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. खान यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दोन्ही घटनांमध्ये भूषण गोसावी व दानिश शेख यांच्यासह काही आरोपींची नावे समान असल्याने या टोळीच्या हालचालींविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गोळीबार, मारहाण, तोडफोड, लूट आणि जिवे मारण्याच्या धमकीसह विविध कलमान्वये उपनगर तसेच नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.