

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात कचऱ्यात होणारी वाढ लक्षात घेता पाथर्डी शिवारातील खतप्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी तब्बल १ लाख ८ हजार ६० चौरस मीटर अर्थात सुमारे २७ एकर आरक्षित जागेचे संपादन करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
मंजूर शहर विकास आराखड्यात मौजे पाथर्डी शिवारातील सर्व्हे नं. २६३ पै., २६४ पै., २६५ पै. आणि २६६ पै. मधील एक लाख आठ हजार चौ. मी. क्षेत्र हे (आरक्षण क्र. ३२४) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी अर्थात खतप्रकल्पासाठी आरक्षित आहे. प्रकल्पाच्या पूर्वेकडील सर्व्हे नं. २६५ व २६६ पै. जागा संपादीत करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत नगररचना विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार पाथर्डी शिवारातील १,०८,०६० चौ.मी. इतके आरक्षित क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन सुविधेच्या विस्तारीकरणासाठी संपादीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यासंदर्भात प्राधान्यक्रम समितीसमोर २८ जुलै २०२५ रोजी भूसंपादन प्रस्ताव सादर केला असता त्यास समितीने मान्यता दिली असून, भुसंपादनाची आवश्यकता लक्षात घेता या प्रस्तावास महासभेने देखील हिरवा कंदिल दाखविला आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कचरा संकलित करण्याचा प्रस्तावही महापालिकेला प्राप्त झाला होता. परंतू त्र्यंबकेश्वरचा कचरा स्वीकारण्यास महापालिकेने नकार दिला आहे. यामुळे आता कुंभमेळा नियोजनाच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथेच स्वतंत्र जागा संपादीत करून त्यावर कचरा विलगीकरण व प्रक्रिया यंत्रणा उभारली जाणार आहे.