

नाशिक : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे रासायनिक खतांच्या किमतीत मागील चार महिन्यांत प्रतिबॅग २५० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन हंगामात झालेल्या दरवाढीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतनिर्मिती उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, खतांच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिएकर लागवड खर्च वाढणार असून, शेतीव्यवसाय तोट्यात जाण्याचा धोका आहे. यंदा हवामान खात्याने एल-निनोचा इशारा दिला.
अनुदानाची गरज
वाढलेला लागवड खर्च व उत्पादनातील घट आणि शेतमालाला मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी खते, बियाणे व कीटकनाशकांच्या खरेदीत अनुदान देण्यासह शेतमालाला लागवड खर्चावर आधारित भाव देण्याची गरज आहे.
शेतमालाचे दर 'जैसे थे'च
दिवसेंदिवस शेतीतील लागवड खर्च वाढत असून, उत्पादनात घट येत आहे. अशात बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमतीदेखील वाढत आहेत. याउलट शेतमालाचे दर मात्र 'जैसे थे'च आहेत.