Simhastha Kumbh Mela | सिंहस्थात समान हक्कांसाठी महिला साध्वींचा एल्गार

Simhastha Kumbh Mela | अमृतस्नानासाठी स्वतंत्र वेळ, प्रवेशमार्ग व सुरक्षाव्यवस्थेची मागणी
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पुरुष साधू-महंतांच्या आखाड्यांप्रमाणे महिला साध्वी आखाड्यांनाही समान धार्मिक दर्जा, सुविधा आणि सुरक्षितता देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली. प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठधाम परी आखाड्याच्या आद्य जगद्गुरू शंकराचार्य त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुंभमेळामंत्री, सिंहस्थ प्राधिकरण आणि समन्वय समितीकडे केली.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या वीज बचतीचा लागणार हिशोब; 'महाऊर्जा'कडून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला साध्वी तसेच महिला भाविकांना अमृतस्नानात समान सहभागाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियोजन करावे. पुरुष साधू-संतांच्या १३ प्रमुख आखाड्यांप्रमाणे महिला साध्वी आखाड्यांनाही समान धार्मिक दर्जा, सन्मान, अधिकार आणि संधी देण्याची मागणी त्रिकाल भवंता यांनी केली आहे.

महिला साध्वी आणि महिला भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमृतस्नानासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करावा. स्वतंत्र प्रवेशमार्ग आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अमृतस्नानाच्या मिरवणुकीत देशातील प्रमुख १४व्या महिला साध्वी आखाड्यांचा अधिकृत सहभाग मान्य करून त्यांना सनातन परंपरेत समान धार्मिक स्थान देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

सिंहस्थाच्या नियोजन समिती, समन्वय समिती तसेच कुंभमेळ्याशी संबंधित धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महिला साध्वी आखाड्यांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली. महिला साध्वींसाठी निवास, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, आरोग्यसेवा आणि सुरक्षा या मूलभूत सुविधा पुरुष आखाड्यांप्रमाणेच उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

वैदिक परंपरेचा दाखला

प्राचीन वैदिक काळापासून गार्गी आणि मैत्रेयी यांच्यासारख्या ब्रह्मवादिनी साध्वींनी सनातन धर्माच्या पालन, जतन, संरक्षण, प्रचार आणि प्रसारात योगदान दिले आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत आजही महिला साध्वी धर्मसेवा, अध्यात्म, संस्कार आणि राष्ट्रकार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य, कपडे तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | गणेशोत्सवापूर्वी नाशिक खड्डेमुक्त होणार? मनपाचा 18,423 खड्डे बुजवल्याचा दावा

प्रमुख मागण्या

  • पुरुष आखाड्यांप्रमाणे महिला साध्वी आखाड्यांना समान धार्मिक दर्जा, सन्मान व अधिकार द्यावेत.

  • अमृतस्नानासाठी स्वतंत्र वेळ आणि प्रवेशमार्ग उपलब्ध करून द्यावा.

  • महिला साध्वी व महिला भाविकांसाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था करावी.

  • अमृतस्नानाच्या मिरवणुकीत महिला साध्वी आखाड्यांचा अधिकृत सहभाग मान्य करावा.

  • सिंहस्थाच्या नियोजन व समन्वय समित्यांमध्ये महिला साध्वी आखाड्यांना प्रतिनिधित्व द्यावे.

  • महिला साध्वींसाठी निवास, पाणी, वीज, स्वच्छतागृहे व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करावी.

  • स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

  • महिला साध्वींच्या धार्मिक कार्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य व मूलभूत सुविधा द्याव्यात.

  • मागण्यांची तातडीने पूर्तता करून संबंधित विभागांना लेखी आदेश द्यावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news