

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक तपासणी मोहीम राबवत, लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. काही आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या असून, एका दुकानावर गुन्हा दाखल करून ते सील करण्यात आले आहे.
मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी शिवार येथील श्रीराम एंटरप्रायझेस येथे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे १७ लाख २७ हजार रुपयांचे सुट्या स्वरूपातील रिफाईंड सोयाबीन तेल जप्त केले. रिपॅकर अथवा उत्पादन परवाना नसणे, विक्रीची बिले उपलब्ध नसणे तसेच भेसळीचा संशय या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली.
अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड आणि चेतन परदेशी यांनी ही कारवाई केली. मालेगावतील कल्ली कुट्टी परिसरातील मेसर्स ए-वन ताज बेकरी येथे तपासणीदरम्यान सुमारे ४०० किलो टोस्ट (किंमत १ लाख ६० हजार रुपये) जप्त करण्यात आला.
बेकरी परवान्याविना सुरू असल्याचे, उत्पादनाचा दर्जा संशयास्पद असल्याचे तसेच अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे आढळून आल्याने आस्थापनाला 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली.
ही कारवाई प्रतीक भड आणि चेतन परदेशी यांनी केली. दरम्यान, विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहायक आयुक्त (अन्न) एस. एस. देवरे, डी. एस. महाले आणि व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
आडगाव येथील जत्रा हॉटेल परिसरातील मेसर्स स्वागतम स्वीट्स येथे तपासणी करून नऊ किलो गाईचे तूप (किंमत ५,७६० रुपये) जप्त करण्यात आले. संबंधित तुपाचा दर्जा निकृष्ट व भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी संकेत येलमामे आणि वैभव गर्दे यांनी ही कारवाई केली.
जुने नाशिक येथील चौकमंडई परिसरातील भारत जनरल स्टोअर येथे छापा टाकून १ लाख १ हजार ७२६ रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित दुकान सील करण्यात आले आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी जी. एम. गायकवाड, अविनाश दाभाडे, ऋतुजा रावसाहेब नवले आणि अक्षय खेडकर यांनी केली.
अन्नसुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगर येथील 'सँडी बेकर्स' या आस्थापनाचा अन्नव्यवसाय परवाना सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांनी निलंबित केला आहे.