Father’s Day 2025 : पित्याच्या अबोल प्रेमाची जाणीव करून देणारा दिवस

fathers-day-2025-celebrated-on-june-15
Happy Father's Day : पित्याच्या अबोल प्रेमाची जाणीव करून देणारा दिवसPudhari File Photo
Published on
Updated on

दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार एका खास कारणासाठी साजरा केला जातो, तो म्हणजे ‘फादर्स डे’, एक असा दिवस जो आपल्या आयुष्यातील आधारस्तंभ अशा वडिलांना समर्पित असतो. 2025 मध्ये फादर्स डे 15 जून रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस केवळ एक तारीख नाही, तर तो आहे त्या अबोल भावना आणि त्यागाचा सन्मान, जो एक पिता आपल्या मुलांसाठी दररोज जगतो, कधी रागावण्यातून व्यक्त होणारे प्रेम, तर कधी शांत राहून दिलेला पाठिंबा...

का साजरा करतो ‘फादर्स डे’?

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्यासाठी न बोलता सर्व काही करणार्‍या वडिलांना दुर्लक्षित करतो. ‘फादर्स डे’ हे अशा व्यक्तीच्या शांत पाठिंब्याची जाणीव करून देण्याचे एक निमित्त आहे. हा दिवस केवळ जैविक वडिलांसाठीच नाही, तर सर्व त्या व्यक्तींसाठी आहे, जे आपल्या आयुष्यात पित्याची भूमिका बजावतात... आजोबा, काका, मोठे भाऊ, शिक्षक, मार्गदर्शक किंवा अशा सिंगल मदर्सही ज्या एकट्या आईबरोबरच पित्याचीही भूमिका पार पाडतात! हा त्यांच्या प्रेम, काळजी आणि आधाराचा सन्मान करण्याचा दिवस आहे.

‘फादर्स डे’चा इतिहास काय आहे?

‘फादर्स डे’ची सुरुवातही एका भावनिक घटनेतून झाली. 1908 साली अमेरिका, वेस्ट वर्जिनियामध्ये कोळसा खाणीतील स्फोटात 361 पुरुषांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतांश वडील होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा घेण्यात आली. मात्र, ही परंपरा पुढे फारशी वाढली नाही. वॉशिंग्टनमधील सोनोरा स्मार्ट डोड हिने ‘फादर्स डे’ मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय मिळवले. तिच्या आईचे निधन झाल्यावर तिच्या वडिलांनी एकटेच सहा मुलांचे पालनपोषण केले होते. ‘मदर्स डे’प्रमाणे वडिलांसाठीही एक दिवस असावा, या विचाराने तिने जून महिन्यात आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘फादर्स डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. 19 जून 1910 रोजी पहिला फादर्स डे साजरा करण्यात आला.

2025 मध्ये कधी साजरा होईल?

यावर्षी ‘फादर्स डे’ 15 जून, रविवार रोजी साजरा केला जाईल. ही तारीख दरवर्षी बदलते; कारण ‘फादर्स डे’ नेहमी जूनच्या तिसर्‍या रविवारी साजरा केला जातो. भारतासह अमेरिका, बि—टन यासारख्या देशांमध्येही हा दिवस एकाच दिवशी साजरा होतो.

आजचा ‘फादर्स डे’ का अधिक अर्थपूर्ण?

आजचे वडील केवळ कमावते पुरुष किंवा शिस्तीचे प्रतीक राहिलेले नाहीत. ते आता मार्गदर्शक, मित्र आणि आधारस्तंभ बनले आहेत. ते मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टस्मध्ये मदत करतात, आजारी पडल्यानंतर औषध देतात आणि मानसिक आधारही देतात. प्रसंगी मुलांना स्वतः खाऊ बनवूनही देतात! त्यामुळे ‘फादर्स डे’ केवळ गिफ्टस् किंवा सेल यापुरता मर्यादित नसून, हा दिवस आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी असतो.

जेव्हा आठवणी उफाळून येतात...

‘फादर्स डे’ काही लोकांसाठी भावनिकद़ृष्ट्या आव्हानात्मकही ठरतो, विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांचे वडील आता हयात नाहीत किंवा ज्यांचे संबंध थोडेसे ताणलेले राहिले. हा दिवस फक्त आनंद साजरा करण्यासाठी नसून, तो माफ करण्याचा, समजून घेण्याचा आणि गतायुष्यातील आठवणी जागवण्याचाही असतो! हॅपी फादर्स डे...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news