

जायखेडा ( नाशिक ) : मोसम खोर्यात पावसाने अर्ध्या हंगामानंतर पाठ फिरवली. पावसाअभावी मका, बाजरी, मूग, उडीद, तूर, भुईमूग या खरीप पिकांची वाढ खुंटली. मक्याला सर्वाधिक फटका बसला. पावसाचा मोठा खंड पडल्याने जमीन भेगाळली, भूजल पातळी खालावली, पिके करपली. कोरडवाहू पिकांची स्थिती बिकट झाली आहे.
उडीद, मूग, तूर हातचे गेले. शेतकरी ‘बा देवा, शेत माझं लई तान्हेलं रं...’ असे म्हणत देवाला साकडे घालत आहे. जूनमधील रिमझिम पावसावर पिकांची वाढ सुरू होती. मागील 10 दिवसांपासून पावसाने ओढ दिली. तापमान वाढल्याने पिके ऊन धरायला लागली. प्रामुख्याने सोयाबीन फुलोर्यात, मका तुर्यात, तर बाजरी कणसावर असताना पावसाची नितांत गरज आहे. येत्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास सोयाबीन, मका, बाजरी यांसह सर्वच पिके करपतील. खरिपाचा खर्च वाया जाण्याची भीती आहे.
शेतकर्यांचा कर्जाचा डोंगर वाढेल. खरीप हंगामाची स्थिती चांगली असल्याने उत्पन्नाची आशा होती. सिंचनाची सुविधा असूनही अनेकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी देता आले नाही. पिकांच्या वाढीसाठी वापरलेली रासायनिक खते व फवारलेली औषधे पाण्याअभावी निष्फळ ठरत आहे. मोसम वगळता इतर ओढे - नाले, नदी कोरडे आहेत. भूजलपातळी खालावली आहे. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडला. पावसाच्या तुटवड्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असताना शेतकर्याला आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहात बसावे लागणार आहे.
पाऊस नसल्यामुळे ओढे- नाले, तलाव, बंधारे कोरडेठाक आहेत. आगामी काळात हीच स्थिती कायम राहिल्यास सिंचनासह पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा जाणवणार आहे. अनेक विहिरी व बोअरवेल्स अद्यापही कोरडेच आहेत. पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे, तरीही अद्याप जे दिवस उरले आहेत, ते पावसाचे प्रतीक्षा करण्यात जात आहेत. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नाले वाहून न गेल्यामुळे पुढील रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.