

इगतपुरी (नाशिक) : तालुक्यात पर्यटन क्षेत्र असल्याने मुंबई - नाशिक महामार्गालगत असलेल्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शेतकर्यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
असाच प्रकार तालुक्यातील गिरणारे येथील शेतकर्याची फसवणूक झाल्याप्रकरणी गट नं. 153 या मिळकतीचे 7/12 ला कुठल्याही प्रकारे दस्तांची नोंद करू नये तसेच फेरफार नोंद नं. 1696 रद्द व्हावी याबाबत शेतकरी अशोक पांडुरंग गोईकणे यांनी तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन देऊन हरकत घेतली आहे.
गिरणारे येथील शेतकरी अशोक पांडुरंग गोईकणे यांची मालकी हिस्सा व कब्जात असलेली जमीन त्यांच्या संमतीशिवाय परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही बाब गोईकणे यांनी तहसीलदार बारावकर यांच्या निदर्शनात आणून दिली. गट नं. 153 या मिळकतीचे 7/12 वरील दस्तांची नोंद व फेरफार नोंद रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हरकत घेत या बाबतचे निवेदन तहसीलदार अभिजित बारवकर यांना दिले आहे.