

नाशिक : शिवारातील प्लॉटचे बनावट खरेदी खताचे दस्तऐवज तयार करत प्लॉटमालकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. अनिल बन्सीलाल जैन (रा. अनमोल नयनतारा इस्टेट) यांच्या फिर्यादीवरून गोरख कचरू कोंबडे (रा. पाथर्डी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल बन्सीलाल जैन हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. जैन यांच्या मालकीचा पाथर्डी शिवारात ३५० चौरस मीटर प्लॉट आहे. ही मिळकत फिर्यादीने कधीही विक्री केलेली नसताना गोरख कोंबडे (रा. गौळाणे रोड, पाथर्डी) याने विशेष मुखत्यार पत्रासोबत खरेदी खताच्या शेवटच्या पानावर फिर्यादीची सही व अंगठा घेतला होता. त्या पानाचा गैरफायदा घेत सहदुय्यम निबंधकांकडे खोटा कबुलीजबाब देत बनावट खरेदीखत दस्तऐवज तयार करत फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जैन यांच्या फिर्यादीनुसार गोरख कोंबडे याच्याविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन अंकोलीकर तपास करत आहे.