

सातारा : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा लाभ उठवण्यासाठी गावागावात एजंट सक्रिय झाले. त्यांनी बनावट दाखले तयार करून बोगस कामगारांची फौजच कागदोपत्री तयार केली आहे. मंडळाच्या योजनांचा लाभ घेणारे आणि बोगस कामगारांकडून कमिशन उकळणारे एजंट गब्बर झाले आहेत. मात्र, आता सहाय्यक कामगार आयुक्तांकडून सुरु झालेल्या तपासणीमुळे अनेकांचे बिंग फुटणार आहे. यात कामगार आयुक्त यांच्याकडे अहवाल गेला असून त्याबाबत लवकरच वरिष्ठांकडून कारवाई केली जाणार आहे.
गेल्या 10-12 वर्षांत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला कोट्यवधी रुपयांच्या योजना मिळाल्या. या पैशातून बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना सुरक्षा साहित्याचा संच देणे, 75 टक्के दिव्यांग कामगारांना दोन लाखांची आर्थिक मदत करणे, कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत वैद्यकीय उपचार करणे, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य, संसारोपयोगी भांडी, घरकुल, काम करताना किंवा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते. अशा विविध योजनांचा लाभ उठवण्यासाठी काही एजंटांनी बोगस कामगारांच्या नोंदी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांकडे केल्या आहेत. बांधकाम क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या हजारो नावांची नोंदणी केली. त्यांच्या नावावर एजंट लाभ उठवत आहेत. राज्यात सर्वत्र हीच स्थिती असल्याने मंडळाच्या कोट्यवधी रुपयांची लूट सुरु आहे.
राज्यात बोगस बांधकाम कामगार वाढल्याच्या तक्रारीनंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यस्तरीय समितीकडून प्रत्येक जिल्ह्यात बोगस कामगारांची तपासणी सुरु आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात या समितीने चौकशी केली असून 12 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. याबाबत अहवाल सादर करून पुणे कामगार आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला आहे. यात कॉन्ट्रॅक्टर यांनी 90 दिवस अनुभवाचे बोगस दाखले दिल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे आता बोगस दाखले देणारे कॉन्ट्रॅक्टर, संघटना व एजंट यांचे धाबे दणाणले आहेत. दहा दिवस टाकलेल्या धाडीत कोरेगाव, खंडाळा येथे बोगस कामगार असल्याचे निदर्शनास आले आहे. समितीने 12 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे अहवाल पुढील आठवड्यात येणार असून कॉन्ट्रॅक्टर, संघटना व एजंट यांचे धाबे दणाणले आहेत.
बनावट दाखल्यांचे रॅकेट...
मोठे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बनावट दाखले तयार करून देणार्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून मृत्यू दाखले, दिव्यांग दाखले, शैक्षणिक कागदपत्रे तयार करुन दिली जात आहेत. मुलीच्या लग्नासाठी मिळणारी मदत लाटण्यासाठी लग्न झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. असे अनेक गंभीर प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहेत.