

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये आयव्हीएफ हॉस्पिटल उभारण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तब्बल ३७ लाख ५० हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बोगस डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रफिक नबीलाल सोबरे (रा. अन्नपूर्णा अपार्टमेंट, कॉलेज रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपी अभिलाष उपासनी व नेहा उपासनी या दोघांनी सोबरे दाम्पत्याचा विश्वास संपादन करून आयव्हीएफ हॉस्पिटल व त्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे, सोबरेंकडून उपासनी दाम्पत्याने वेळोवेळी २२ लाख ५० हजार रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात घेतले. परंतु, रक्कम परत केली नाही.
शिवाय, अभिलाष याने डॉक्टर असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे १५ लाखांच्या कर्जासाठी बँकेकडे प्रकरण सादर केले. या कर्ज रकमेतून सोबरे यांना त्यांचे पैसे परत करण्याचे आमिष दाखवून, कर्जप्रकरणावर जामीनदार म्हणून स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. अशाप्रकारे बँकेची व फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
हा प्रकार २०१८ ते १६ ऑक्टोबर २०२० यादरम्यान कॉलेज रोड येथील घरी व कॉसमॉस बँकेत घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित उपासनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.