

नाशिक : जिल्हा शल्यचिकित्सकांकडे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नेमणुकीच्या आदेशाची प्रत बदली करून शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश सोपानराव पाटील (रा. थत्तेनगर, गंगापूर रोड) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले की, संशयित जिजाबाई मुरलीधर गायकवाड, मिलिंद सतीश पवार व मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनी आपसात संगनमत केले. संशयित आरोपी जिजाबाई गायकवाड यांची जात गोंधळी असताना ती झाडगल्ली-१२ असल्याचे बनावट जातप्रमाणपत्र जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक येथे संशयित आरोपी मिलिंद सतीश पवार याला सफाईगार म्हणून नोकरीस लावताना सादर केले.
तसेच संशयितांना मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनी मिलिंद पवार यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत बदली करून शासनाची फसवणूक केली. हा प्रकार १२ फेब्रुवारी २०१८ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.