

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील कथित घोटाळ्यावरून राज्यभर 'रामरक्षा आंदोलन' पेटविण्याचा प्रयत्न केला असताना, नाशिकमध्ये काळाराम मंदिरातील 'रामरक्षा आंदोलन' महाआरतीला ठाकरे गटाच्या एकूण १५ नगरसेवकांपैकी केवळ सीमा पवार, माधुरी डेमसे आणि वैशाली दळवी, प्रथमेश गिते हे चारच नगरसेवक उपस्थित होते.
इतर ११ नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे या नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. याबाबत जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांना विचारले असता, त्यांनी या प्रश्नाला बगल दिली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण आणि जमीन व्यवहारांमध्ये झालेल्या आर्थिक अपहार व तिजोरीतील लूटमारीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शनिवारी (दि. ११) राम मंदिराच्या निधीत झालेली लूट हा 'रामद्रोह' आणि 'हिंदुद्रोह' म्हणजेच 'देशद्रोह' असल्याचा घणाघात करत, ठाकरे पक्षाने ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात सामूहिक रामरक्षापठण आणि महाआरती आंदोलन केले. नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले.
आंदोलनादरम्यान 'रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलियुग आयेगा, चौकीदार चोर निकलेगा, धर्म के नाम पैसा खायेगा', 'गर्व से कहो हम हिंदू हैं', असे फलक दाखवत शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा निषेध केला. जय श्रीरामच्या घोषात आधी सामूहिक रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे पठण व त्यानंतर श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राची महाआरती केली.
याप्रसंगी माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जे. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, सागर कोकणे, स्वाती पाटील, शैलेश सूर्यवंशी, सचिन बांडे, राहुल दराडे, बाळू कोकणे, सुभाष गायधनी, विशाल कदम, शरद चव्हाण, मंदार बर्वे, सुभाष शेजवळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रामालाही लुटले : मिर्लेकर
महाआरतीनंतर मिर्लेकर यांनी भाजपवर कडाडून टीका केली. सामान्य जनता लुटली जात असताना, आता थेट रामालाही लुटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा दाखला देत त्यांनी, राम मंदिर अपहार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर तीव्र कटाक्ष टाकला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या जन्मभूमीची माती अयोध्येला नेऊन राम मंदिराचा संकल्प केला होता आणि आगामी काळातही ते अयोध्येला जाणार आहेत. हा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन करत, प्रत्येक गावात 'रामरक्षा आरती'चे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले.