

मुंबई : आपण कट्टर आणि देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आणि भाबडे असू, पण मूर्ख नाही. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी प्रभू श्रीरामांच्या मंदिरालाच लुटत असेल, तर हिंदू त्यांना कधीही माफ करणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. अयोध्येत चोरी केली, उद्या काशी-मथुरेचं काय? असा सवाल करत भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अयोध्येतील काही महंतांवर त्यांनी यावेळी जोरदार टीकास्त्र सोडले.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या निषेधार्थ दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिर (पुरातन वटवृक्ष मंदिर) येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आंदोलनाची सुरुवात रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसाच्या पठणाने तसेच महाआरतीने करण्यात आली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे अयोध्येतून आलेले साधू-संत, महंत आणि पंडित हेही यावेळी उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले. आमदार आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत हे दोन्ही खासदार, नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.
राम मंदिर उभारणीत शिवसेनेचे योगदान
राम मंदिर उभारणीतील शिवसेनेच्या योगदानाची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘मंदिर वहीं बनाएंगे’च्या घोषणा दिल्या जात होत्या, त्या काळात शिवसैनिकांनी सर्वाधिक संघर्ष केला. शिलापूजन, रथयात्रा आणि प्रत्यक्ष अयोध्येतील कारसेवेत शिवसैनिकांनी रक्त सांडले, अनेकांनी बलिदान दिले. त्या आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलींचे सर्वाधिक चटके मुंबईने सोसले. त्या कठीण काळात भयभीत हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. परंतु ज्या राम मंदिरासाठी आम्ही संघर्ष केला, त्या आंदोलनातून लाभ घेणारी व्यक्ती आज देशाच्या पंतप्रधानपदी बसली आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला, असा हल्ला चढवला.
कथित निधी अपहाराची निष्पक्ष चौकशी करावी
राम मंदिरातील कथित निधी अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करताना चोरालाच तपासाची जबाबदारी दिली तर सत्य बाहेर कसे येणार, असा सवाल केला. अयोध्या तर फक्त झांकी आहे, काशी आणि मथुरा अजून बाकी आहेत. अयोध्येची अशी अवस्था असेल, तर उद्या काशी आणि मथुरेचे काय होईल, याची चिंता वाटते, असे ते म्हणाले.
कथित गैरव्यवहारावर उत्तर द्यावे
जे लोक प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण करतात, त्यांनी आधी राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावर उत्तर द्यावे. आम्ही रामभक्त आहोत. त्यामुळे रामाच्या नावावर कुणी भ्रष्टाचार करत असेल, तर त्याचा निषेध करणे हे आमचे कर्तव्य आहे. चोरांना प्रभू श्रीरामांचे नाव घेण्याचा आणि भगवा हातात घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही त्यांनी केला. हिंदूंनी आता या संभ्रमातून बाहेर पडावे. प्रत्येक गावात, प्रत्येक मंदिरात आणि सार्वजनिक ठिकाणी रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करून या कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा. प्रभू श्रीरामांच्या नावाची आणि मंदिराच्या पावित्र्याची रक्षा करण्यासाठी सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरेंनी देशभरातील हिंदूंना आवाहन केले.