

नाशिकरोड : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत नाशिकमधील एका नागरिकाला तब्बल १२६ वर्षांचा दाखवण्यात आल्याने निवडणूक विभागाच्या कारभारातील भोंगळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
नाशिकरोड येथील गौतम संपत सोनवणे ( ४८) या नागरिकाला मिळालेल्या नवीन मतदार ओळखपत्रावर त्यांचे वय १२६ वर्षे दाखवण्यात आले आहे. चुकीच्या जन्मतारखेच्या नोंदीमुळे हा विचित्र प्रकार उघड झाला असून, आयोगाच्या डेटा व्यवस्थापन आणि पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोनवणे यांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. त्यांच्या कागदपत्रांनुसार जन्मतारीख ५ डिसेंबर १९७७ अशी आहे. मात्र, मिळालेल्या मतदार ओळखपत्रावर ३० डिसेंबर १८९९ ही तारीख नमूद करण्यात आली असून त्यानुसार त्यांचे वय १२६ वर्षे दाखवले गेले आहे.
मी ऑनलाइन प्रक्रिया करताना सर्व कागदपत्रे बरोबर दिली होती. माझी जन्मतारीख नोंदवताना चुकीची नोंद झाली. हा केवळ तांत्रिक दोष नसून शासनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.
गौतम सोनवणे, वृत्तपत्र विक्रेते
मतदार ओळखपत्र हातात घेताच सोनवणे यांच्या लक्षात हा प्रकार आला. सर्व कागदपत्रे योग्यरीत्या सादर केल्यानंतरही अशी चूक कशी झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरात निवडणूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत चर्चा रंगल्या आहेत.