

Hindi Language Compulsion Row
नाशिक : महाराष्ट्रात सीबीएसईसह (CBSE) इतर मंडळ आणि माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शनिवारी (दि.२८ जून) स्पष्ट केले. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भुसे नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, पत्रकार परिषद सुरु असताना दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. यामुळे ते पत्रकार परिषदमधून उठून बाजूला गेले. यावेळी दोघांमध्ये काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर दादा भुसे यांनी येऊन पुन्हा पत्रकार परिषद सुरु केली.
'आता तुम्हाला जे पत्रकार परिषदेत सांगितले तेच मी एकनाथ शिंदेंना सांगितले', असे भुसे यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे भुसे यावेळी म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. यासंदर्भात वेळोवेळी कागदपत्रे, आकडेवारी, पाठीमागील प्रवास याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. मराठी आपली मातृभाषा असून ती राज्याची राजभाषा आहे. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक आहे. अनेक भाषांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सुत्र स्वीकारले असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मला अतिशय आनंदाने सांगायचे आहे की केंद्र शासनाने एक प्रारूप दिले आहे. किती तासिका द्यायला पाहिजेत? त्यात १० तासिका मातृभाषेसाठी दिल्या आहेत. आपण १५ तास मराठी भाषेला दिले आहेत. एका आठवड्यासाठी हे प्रस्तावित केले आहे. जास्तीचा वेळ मराठी भाषेला दिला जात आहे. अनेक वर्षांपासून इंग्रजी भाषा, मराठी माध्यम आणि इतर माध्यमांत हे स्वीकारले आहे. आताच्या घडीला प्रारूप बनविले आहे. त्यात २२ भाषा आहेत. विद्यार्थी जी भाषा निवडतील त्यांना ती शिकवावी लागेल. असे अपेक्षित आहे की किमान २० विद्यार्थी असावेत. ३० विद्यार्थी असल्यास त्या वर्गाला मान्यता देणे. २० विद्यार्थी मागणी करतील ती भाषा शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देऊ, असे भुसे यांनी सांगितले.
कोणतीही विशिष्ट भाषा घ्यावी हे बंधन नाही. पहिली आणि दुसरीला तिसऱ्या भाषेचे पुस्तक नाही. अभ्यासही नाही. फुल, खेळणी यातून चित्र दाखवून तोंडी शिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. तिसरीपासून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पुस्तक असेल, असेही ते म्हणाले.