

Samruddhi Mahamarg Inauguration Eknath Shinde Ajit Pawar Car Ride
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या ७६ किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच गाडीतून महामार्गावरून टेस्ट ड्राईव्ह घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीचे सारथ्य केले.
यावर इगतपुरी येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमच्या ऑडी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी माझं स्पीडवर लक्ष होतं आणि सुरक्षित आम्ही पोहोचलो. शिंदे यांच्या बाजूल देवेंद्र फडणवीस बसले होते. मागे मी बसलो होतो. गाडी व्यवस्थित चालली आहे की नाही हे पाहत होतो. माझ्याजवळ अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या. जाताना गाडी व्यवस्थित गेली. ही सुरुवात होती, त्यामुळे धोका न पत्करता एकनाथ शिंदेंनी सारथ्य केलं. येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केले. १२० च्या स्पीडने गाडी जाऊ लागली. टनेल येईलपर्यंत गाडीचा स्पीड १२० होता. टनेल सुरू झाल्यावर १०० स्पीडवर गाडी आली. असे आम्ही अतिशय सुरक्षित येथे पोहोचलो, असे सांगून आम्ही उतरविलेल्या विम्याचे उपयोग आम्हाला करावा लागला नाही. तुम्ही सुद्धा असा सुरक्षित प्रवास करा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. सुरुवातीला या प्रकल्पाला अनेकांनी विरोध केला. पण मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला सुरूवात केली आणि शेवट पण ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच केला. असा योग फार क्वचित पाहायला मिळतो. १२ कोटी सिमेंट पोती या महामार्गाच्या बांधकामाला लागली आहेत. या महामार्गावर आता स्वच्छता गृह आणि उपहारगृह तयार करणार आहोत.
यंदाच्या वर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 25 कोटी म्हणजे 100 कोटी पंचवार्षिक योजनेत वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील पहिल्या पाच शहरातील पहिला रुंद टनेल पुण्याला होणार आहेत.