

Samruddhi Expressway Inauguration Devendra Fadnavis
नाशिक : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सुरू होत आहे, ही महायुतीच्या सरकारसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. २०१४ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर बघितलेले स्वप्न आज याठिकाणी पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्ग हा रस्ता नाही, तर समृद्धीचा कॉरिडॉर आहे, असे गौरवोद्रगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ५) काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या ७६ किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन महायुतीच्या प्रतिनिधींनी केले. लवकरच वाढवण बंदर सोबत या महामार्गाला जोडणार आहोत. सर्वात रुंद बोगदा हा इगतपुरी येथे आहे. मात्र याचा रेकॉर्ड आपणच तोडू. या मध्ये फायर यंत्रणा केली आहे. ६० टेम्परेचर पर्यंत तापमान जाईल, तेव्हा आपोआप पाण्याची फवारणी सुरू होते. अपघात झाला, तर जोड बोगदे तयार केले आहेत. या टप्प्यात इगतपुरी, खूटघर, आमने येथे ३ इंटरचेंज ठेवण्यात आले आहेत.
या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याच्या सुचना वन विभागाला देण्यात आलेल्या आहेत. १ हजार शेततळी तयार केली आहेत. २२ ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल प्रणाली असून ६१ टोल प्लाजा महामार्गावर आहेत. १४ किमी फायबर ऑप्टिक टाकण्यात आले आहे. हा महामार्ग अपघात मुक्त कसा होईल? यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 701 किमी चा हा देशातील आणि महाराष्ट्रातील गेम चेंजर प्रकल्प आहे. सर्वात कठीण हा प्रकल्प होता. हा प्रकल्प होणार नाही, असे काहींना वाटत होत. किंवा होऊन नये, यासाठी प्रयत्न करत होते. या महामार्गामुळे 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 अप्रत्यक्ष जिल्हे जोडले गेले आहेत. पूर्वी प्रवासाला 18 तास लागत होते. आता 8 तास लागणार आहेत. वन्य जीव यांच्यासाठी 100 अंडर पास ओव्हर पास केले आहेत. माणसासाठी रस्ता तयार करत असताना वन्य जीवांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली आहे. हा महामार्ग कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरेल. या मार्गामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. सुरुवातीला या प्रकल्पाला अनेकांनी विरोध केला. पण मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला सुरूवात केली आणि शेवट पण ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच केला. असा योग फार क्वचित पाहायला मिळतो. १२ कोटी सिमेंट पोती या महामार्गाच्या बांधकामाला लागली आहेत. या महामार्गावर आता स्वच्छता गृह आणि उपहारगृह तयार करणार आहोत.