Raj Thakrey : राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौ-यावर असून ते संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होत आहेत. नाशिकच्या संत निवृत्तानाथ दिंडी सोहळ्यासाठी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहत आहेत.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – शेकडो वर्षांची परंपरा असलेली संत निवृत्तिनाथांची पालखी चांदीच्या रथात ठेवून गुरुवारी (दि.२०) हजारो वारकऱ्यांबरोबर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळा रंगणार आहे. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.
संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिरात आरती होऊन पादुका असलेली पालखी रथात विराजमान होईल. तेथून पुढे कुशावर्त तीर्थावर महापूजा होईल आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर वारकरी अभंग सादर करतील. टाळमृदंगाच्या ठेक्यात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान करतील. पहिला मुक्काम पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात राहणार आहे. तेथे आरती भजन कीर्तन जागर होईल. त्र्यंबकवासीयांतर्फे महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. पालखी प्रस्थानाला यंदा 25 ते 30 हजार वारकरी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
यावर्षी पालखी प्रस्थानाला मनसेचे संस्थापक राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. मनसैनिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे, त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन त्यानंतर कुशावर्तावर दर्शन व त्यानंतर पालखी प्रस्थानासाठी संत निवृत्तिनाथ मंदिर येथे सहभाग असा सर्वसाधारण कार्यक्रम आखण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याने मनसैनिकांत उत्साह संचारला आहे.
हेही वाचा: