Chandrasekhar Bawankule | भूकंपाचे हादरे विरोधकांना बसतील : बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे टीकास्त्र

Chandrasekhar Bawankule
महायुतीला विधानसभेत भरघोस यश मिळणार असून, त्याचे हादरे विरोधकांना बसतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.File Photo
Published on
Updated on

नाशिक : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची काँग्रेस व शरद पवार गटाचे जयंत पाटील यांना भीती लागून असते. घाबरलेल्या विरोधकांकडून घटस्थापनेला राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगितले जाते. पण राज्यात जेवढे भूकंप व्हायचे ते होऊन गेले आहेत. महायुतीला विधानसभेत भरघोस यश मिळणार असून, त्याचे हादरे विरोधकांना बसतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. हिंदुत्वापासून दूर गेलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लाचार असल्याचा आरोप त्यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी (दि. २५) भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता महाशिबिरानिमित्ताने नाशिकमध्ये आले. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शाह यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यांमुळे विराेधकांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांना झोपदेखील लागत नसल्याची टीका केली. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्याने शरद पवार व काँग्रेसच्या दारात मुख्यमंत्री पदासाठी कटोरा घेऊन फिरण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. याच लाचारीमुळे लाेक त्यांना सोडून जात आहेत, अशा शब्दांत बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

नागपूरमधील कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरावरून सुरू असलेल्या राजकारणावर बावनकुळे यांनी खंत व्यक्त केली. मी त्या संस्थानाचा मागे अध्यक्ष हाेता. ते धार्मिक व सामाजिक स्थळ आहे. संस्थानाला 1 कोटी 48 लाख रुपये भरायचे आहे. नाना पटोले व विजय वडवेट्टीवार हे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन निवडणुकीत अर्ज भरतात असे सांगत कोणत्याही धार्मिक देवस्थानावरून राजकारण करू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. अक्षय शिंदे एन्काउंटरबद्दल न्यायालयाने काही बाबींवर ताशेरे ओढल्याबद्दल बावनकुळेंचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर पोलिस न्यायालयात उत्तरे देतील. पण, या मुद्यावरून विरोधकांकडून सुरू असलेले राजकारण योग्य नाही. त्यामुळे राज्याचा स्तर कमी होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शाह मुंबईचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळते आहे. पुढील ८ ते दहा दिवसांमध्ये ते मुंबईचा दाैरा करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल देवेंद्र फडणवीस व मी स्वत: त्यांच्याशी बोललो आहे. आम्ही सकारात्मक असून, निर्णय आता त्यांनी घ्यायचा आहे, असे सांगत बावनकुळे यांनी पक्षप्रवेशाचा चेंडू खडसेंकडे भिरकावला.

अजित पवार नाराज नाही

राज्यात विधानसभेच्या ८० ते ९० टक्के जागा वाटपावरील चर्चा पूर्ण झाली आहे. तिन्ही पक्षांचे नेते लवकरच त्याची घोषणा करतील, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचा बावनकुळे यांनी इन्कार केला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी खा. शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत बावनकुळे यांना विचारले असता भेट घेण्यात गैर नाही. पण त्यामुळे पिचड नाराज असल्याचा अर्थ लावणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news