

येवला (नाशिक) : तालुक्यात केवळ ३० टक्के शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केली असून अद्याप बहुतांशी शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरच्या आत पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये ॲपद्वारे खरीप हंगामातील पिकाची ई-पीक पाहणी अचूक नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगाम २०२५ ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत येवला तालुक्यात आजपर्यंत २४६८४.१३ हे. आर. एवढ्या क्षेत्रावर, एकूण ९१ हजार १४७ पिक पाहणी करावयाच्या प्लॉटपैकी २७ हजार ८७४ प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी डीसीएस व्हर्जन ४.०.० या मोबाईल ॲपव्दारे आपल्या सातबारावर नोंदणी केली आहे. आजवर येवला तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई-पीक पाहणीची नोंदणी ३०.५८ टक्के क्षेत्रावर झालेली आहे. उर्वरीत क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी ॲप व्दारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
ॲपद्वारे लॉगिन केल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा गट क्रमांक निवडावा. पिकांची माहिती जसे की पीक क्षेत्र, पेरणीची तारीख आदी काळजीपूर्वक भरावी. अॅपमध्ये आता ५० मीटरच्या आतून पिकांचा फोटो काढणे बंधनकारक आहे, जेणेकरून पिकाची अचूक माहिती मिळेल. एकदा माहिती जतन (सेव्ह) केल्यावर, ती आपोआप सातबारावर नोंदवली जाते. यामुळे शेतातील पिकांची नोंदणी अधिकृतपणे होते.