ई-पीक नोंदणी सक्ती नको, पीक विम्याचा सरसकट लाभ द्या

ठाकरे शिवसेनेची सावंतवाडी तहसीलदारांकडे मागणी; शेतकर्‍यांकडून विमा कंपनीचे अधिकारी धारेवर
e-crop registration
सावंतवाडी ः तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना आ.महेश सावंत. सोबत बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, मायकल डिसोजा आदी. (छाया ः हरिश्चंद्र पवार)
Published on
Updated on

सावंतवाडी ः ई-पीक नोंदणीची आयत्यावेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर शेतकर्‍यांना सरसकट विमा योजनेचा लाभ द्या. कोणाला लाभापासून वंचित ठेवू नका, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुंबईतील आ. महेश सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली. विम्याचा लाभ देण्यास काही अडचणी असतील तर आत्ताच सांगा, आपण थेट आयुक्तांशी बोलू, मात्र शेतकरी व बागायतदारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊया, असे त्यांनी सांगितले.

फळ पिक विमा योजनेपासून वंचित शेतकर्‍यांची बाजू मांडण्यासाठी मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आ. महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्री. पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयात उपस्थित विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना पदाधिकार्‍यांनी धारेवर धरले.

उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा उपस्थित होते. उपस्थित शेतकर्‍यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले असतानाही कंपनीचे अधिकारी एसी मध्ये बसून पंचनामे करीत आहेत तर दुसरीकडे शासन आयत्यावेळी ई-पिक नोंदणी करण्याचे अध्यादेश काढत आहे.

परंतु शेतकरी शेतावर किंवा बागायतीत काम करत असल्यामुळे तो या ठिकाणी येणार कसा? त्याला या गोष्टींची पूर्तता करणे शक्य नाही. तसेच या नोंदणीसाठी दिलेला कालावधी हा अत्यंत कमी असल्यामुळे हा शेतकर्‍यांसाठी फार्स ठरणार आहे व शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जुन्याच कागदपत्राच्या आधारे संबंधित शेतकरी व बागायतदारांना विम्याचा लाभ देण्यात यावा, कोणाला वंचित ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी उपस्थित शेतकर्‍यांकडून करण्यात आली.

हाच धागा पकडत आ. महेश सावंत व रूपेश राऊळ, बाबुराव धुरी, मायकल डिसोजा यांनी तहसीलदार श्री.पाटील यांना विनंती केली. तालुक्यातील एकही शेतकरी व बागायतदार या विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या. त्यादृष्टीने महसूल प्रशासन, कृषी अधिकारी व संबंधित विमा योजनेचे अधिकारी यांना एकत्र बसून पंचनामे व आवश्यक त्या नोंदी घालण्यास सांगा. ज्या ठिकाणी ई-पिक विमा योजना नोंदणी झालेली नाही त्या ठिकाणी जुने सातबारा घेऊन त्यांना विमा योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी आ. सावंत यांनी केली.

एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्यास पुन्हा ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. सावंत व शिवसेनेच्या अन्य पदाधिकार्‍यांनी दिला. माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, निशिकांत पडते, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, संदीप माळकर, सोनू दळवी, शैलेश गवंडळकर, सोनू कासार, राजू शेटकर, बाळा बोभाटा, बाळा फोंडबा, अशोक धुरी, रियाझ खान, संदीप गवस, प्रकाश ठिकार, आबा केरकर, निशिकांत तोरसकर, बाळू परब आदी उपस्थित होते.

तहसीलदारांकडून सकारात्मक कार्यवाहीचे आदेश

शिवसैनिकांच्या या मागणीला तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुक्यातील विमा योजनेस पात्र शेतकरी व बागायतदार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सकारात्मक प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना या बैठकीतच दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news