E-KYC Ration Distribution : ई- केवायसी असेल तरच मिळेल रेशनचे धान्य
कळवण (नाशिक) : तालुक्यातील सुमारे ४० हजार लाभार्थींना वारंवार सूचना देऊनही अनेकांचे ई- केवायसी झालेले नाही. ३० जूनपासून ई- केवायसी असेल अशा लाभार्थींना धान्य मिळणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींनी चार दिवसांत ई- केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांना धान्यापासून मुकावे लागणार असण्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली.
शासनाने ई- केवायसी असलेल्या लाभार्थींनाच धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ई- केवायसी करण्यासाठी विविध मोहिमा सुरू आहेत. त्यानंतरही अनेकांनी केवायसी केलेली नाही. तालुक्यात ४० हजारांवर अधिक रेशनकार्ड धारकांनी ई- केवायसी केलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आता तरी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कळवण तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार राेहिदास वारुळे यांनी रास्त भाव दुकानदारांना याविषयी स्पष्ट सूचना दिल्या. गावात जास्तीत जास्त लाभार्थींचे ई- केवायसी करून घ्यावे. गावागावात दवंडी द्या, त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी पोलिसपाटील यांची मदत घ्यावी, सूचना दिल्या.
पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ यांनी उपस्थित रास्त भाव दुकानदारांना ई- केवायसीसंदर्भात मार्गदर्शन केले. दुकानदारांच्या तक्रारींचे निवारण केले. गोदाम व्यवस्थापक हृषिकेश देशमुख, गायत्री बागूल, तंत्र सहायक आकिब शेख आदींसह तालुक्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.
जेथे रेशन घेतो, तेथे जाऊन आपले व आपल्या परिवाराचे ई- केवायसी करून घ्यावे. अन्यथा ३० जूननंतर लाभार्थींचे रेशन बंद होणार आहे.
रोहिदास वारुळे, तहसीलदार, कळवण, नाशिक.
दुकानदारांच्या अडचणी
वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद नाही, लाभार्थी ई- केवायसीसाठी येत नाहीत, नागरिकांकडूनच प्रतिसाद नसल्याने अडचण.
