

नाशिक : द्वारका चौकातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि मुंबई नाका परिसरातील अतिक्रमणांमुळे झालेल्या विद्रूपीकरणावरून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ चांगलेच संतापले.
टोलवाटोलवी करणाऱ्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत, 'मी काय येडगावहून आलोय का? मी मुंबई महापालिका सांभाळली आहे. कोणाचे काय काम हे मला चांगले ठाऊक आहे. अधिकारी काम करत नसतील, तर मी स्वत: रस्त्यावर उतरतो, असा थेट इशाराच भुजबळ यांनी महापालिका, वाहतुक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी शनिवारी (दि. १४) द्वारका चौक परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. द्वारका चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केल्यानंतरही कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात, सर्व्हिस रोडवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे. याबाबत भुजबळ यांनी विचारणा केली असता, मनपा अधिकाऱ्यांनी, हे आमचे काम नाही, असे उत्तर दिले. त्यावर भुजबळ चांगलेच संतापले. 'मी मुंबई महापालिका सांभाळली आहे. कोणाचे काय काम हे मला चांगले माहीत आहे. अधिकारी काम करत नसतील, तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो, असा थेट इशारा भुजबळ यांनी दिला. 'सध्याचे अधिकारी खूप बिझी झालेत. मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे पण येथे पाहणीसाठी येण्यासाठी वेळ नाही, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
द्वारका चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारे सर्कल महापालिका, वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हटविले असून, या ठिकाणी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करत असताना मंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.