Dussehra Nashik 2024 | दसऱ्यानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी रामकुंडावर होणारा रावण दहन कार्यक्रम आणि शहरातील देवी मूर्ती विर्सजन निमित्ताने परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दसऱ्यानिमित्त येथील चतुर्संप्रदाय आखाडा यांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रावण दहनापूर्वी राम लक्ष्मण सेनेची मिरवणूक आखाडाच्या वतीने शनिवारी (दि.12) सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे.
रावण दहनाचा कार्यक्रम
मालेगाव स्टॅंड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा, श्री काळाराम मंदिर-सरदार चौक, साईबाबा मंदिरमार्गे रामकुंडाजवळील वाहनतळ मैदान येथे मिरवणूक येणार आहे. या ठिकाणी राम व रावण युध्द होऊन शनिवारी (दि.12) रात्री 10 वाजता रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने शहरातील नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळांकडून रामकुंडावर देवी मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असल्याने मिरवणुकीने देवी मूर्ती वाहनांमधून आणल्या जातात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे.
सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
शनिवारी (दि.12) दुपारी तीनपासून रात्री 10 पर्यंत मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगे महाराज पूल तसेच गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक, रामकुंड ते मालेगाव स्टँण्डकडे ये जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गणेशवाडी, काट्यामारूती चौकी, निमाणी बस स्थानक- पंचवटी कारंजा यामार्गे इतरत्र ये जा करावी लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

