

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार वारंवार गडगडत आहे. घसरणीच्या या ट्रेंडमुळे शेअर मार्केटमधील छोट्या मोठ्या गुंतवणुकदारांनी कष्टाचे पैसे गमावले आहेत तर अनेक गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. अशातच शेअर मार्केटमध्ये तब्बल 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने नाशिकमधील एका तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.
शेअर्स मार्केटमध्ये सुमारे १६ लाख रुपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे (३०) या तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना बुधवारी (दि.26) सातपूर परिसरात घडली. या घटनेत 98 टक्के भाजलेल्या या तरुणाचा तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.28) रोजी उपचारादरत्यान मृत्यू झाला.
चांदवड तालुक्यातील विटाई येथील रहिवासी व सध्या खुटवडनगर परिसरात राहणारा रवींद्र प्रारंभी खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होता. नंतर तो खासगी बँकेत नोकरी करू लागला. त्याने त्याला मिळत असलेले पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मार्केट गडगडल्याने कंगाल झाल्याने तो नैराश्यात गेला होता. ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर जाऊन त्याच्या दुचाकीतील पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले.
शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानामुळे आपल्या आई वडीलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याने पिंपळगांव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर दुचाकीवर बसून स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत त्याने जीवन संपवले.