

नाशिक : बुद्धीवाद शिकवून येत नाही, संस्कार हे संस्कार वर्गातून घेता येत नाहीत, तर भोवताली टीपले तरच ते येतात. माझी जडणघडण अशाच भोवतालच्या वातावरणातून झाली. त्यामुळे बुद्धीवाद आणि संस्कार याची अचूक व्याख्या समजून घेणे शक्य झाले, असे प्रतिपादन दिल्लीत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
प्रसादबापू हिरे मित्र मंडळ, कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट, मालेगाव यांच्यावतीने गंगापूर रोड येथील आयएमआरटी महाविद्यालयाच्या ऑडीटोरिअममध्ये आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात प्रकट मुलाखतीप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्ह्यात झालेल्या जन्मापासून ते नाशिकमध्ये नोकरीनिमित्तच्या कालखंडाचा त्यांनी प्रवास उलगडला. नोकरीनिमित्त नाशिकमध्ये आल्यानंतर आजोबा रावसाहेब पिंगळे यांच्याकडे वास्तव्यास असताना बुद्धीवाद समजल्याचे त्या म्हणाल्या. आजोबांच्या घरी पुस्तकांचे समृद्ध असे दालन होते. त्याठिकाणी इतिहास वाचता आला. आत्मचरित्राची ओळखही तिथेच झाली.
कौटूंबिक पार्श्वभूमी सांगताना कुटुंबात राजकीय विचारधारा वेगळी होती. मात्र, कौटुंबिक वातावरण एक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नाशिकमधील अनेक विद्वान मंडळींचा सहवास लाभल्याबाबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मराठी साहित्याचे अभ्यासक विजय सोहनी, ग्रंथालय संघाचे विभागीय अध्यक्ष अजय शाह, साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गोरवाडकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
दरम्यान, साडी, खन, शाल आणि सन्मानपत्र देवून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कुसुमाग्रज प्रतिष्ठाणचे विलास लोणारी, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, प्रणव हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे प्रसाद हिरे, विश्वस्त गीतांजली हिरे होत्या. यावेळी लोकेश शेवडे यांनी डॉ. तारा भवाळकर यांचा परिचय करून दिला.
बुद्धीवाद काय असतो?
बुद्धीवाद काय असतो, याचे उदाहरण सांगताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, आमच्या आजी पारंपारिक विचाराच्या होत्या. त्या आजोबांना नेहमी सांगायच्या की, 'दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. ती यमाची दीक्षा असते'. एके दिवशी आजोबांनी आजीला स्पष्टपणे सांगितले की, 'मग मी दक्षिणेकडेच पाय करून झोपेल. कारण यम जर मला घेण्यास आला तर किमान मी त्याला लाथ तरी मारू शकेल.' त्यांचे हे उदाहरण त्यावेळी हसण्यासारखे असले तरी, तो बुद्धीवाद होता.