आपली संस्कृती कधीही दुसर्‍यावर लादायची नसते : डॉ. तारा भवाळकर

राजमती पाटील ट्रस्टतर्फे ‘जनसेवा’ पुरस्कार प्रदान
 Sangli News
सांगली : संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना प्रा. अविनाश सप्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. (छाया : सचिन सुतार)
Published on
Updated on

सांगली ः स्वत:हून स्वीकारलेली, आत्मस्वीकृत केलेली, कोणतेही बंधन नसते ती संस्कृती असते. संस्कृती कधीही दुसर्‍यावर लादायची नसते अन्यथा ती गुलामगिरी ठरते, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले. येथील राजमती ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार 2025’ डॉ. भवाळकर यांना प्रदान करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. भवाळकर म्हणाल्या, मी साहित्य, नाट्य यासह ज्या ज्या क्षेत्रात काम केले, तेथे एका मर्यादेनंतर स्वत:हून थांबले. अभिनयाचे रौप्यपदक ज्या दिवशी मिळाले, त्यादिवशी नाटकाला रामराम केला. नवीन लोकांना संधी मिळावी, यासाठी स्वत:हून बाजूला झाले. सांगलीत आज नाट्य चळवळ उभी आहे, ज्याची सुरुवात मी केली, याचा अभिमान आहे. माझा जन्म पुण्याचा. नंतर वाढले नाशिकमध्ये. त्यानंतर आले सांगलीत, भावाच्या शिक्षणासाठी. गेली 55 वर्षे सांगलीने मला प्रचंड प्रेम दिले. त्यामुळे 98 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळणे, हा माझा नव्हे, तर समस्त सांगलीकरांचा गौरव आहे.

प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष निवड व वाद हे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. मात्र डॉ. भवाळकर याला अपवाद ठरल्या. त्यांचे नाव पुढे आल्यानंतर सर्वांनीच एकमताने त्यांची निवड केली. त्यांच्या निवडीनंतरही त्यावर कोणताही वाद-विवाद झाला नाही. उलट संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचे कौतुक केले. भवाळकर यांची निवड त्यांच्या लोककला, लोकसाहित्य व लोकसंस्कृती या कार्यातील अत्युच्च कामगिरीची दखल आहे. भवाळकर यांनी लोककला, लोकसाहित्य व लोकसंस्कृतीला मराठी वाङ्मयाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्यामुळेच हे साहित्य अभिजात मराठीच्या व्यासपीठावर आले. स्वागत व प्रास्ताविक राजमती पाटील ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी केले. ट्रस्टचे विश्वस्त प्रीतम चौगुले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पल्लवी पाटील यांनी केले. यावेळी शांतिनाथ कांते, सुहास पाटील, डॉ. दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.

मीही सात नद्यांचे पाणी प्यायले आहे...

त्या म्हणाल्या, ‘बारा गावचं पाणी प्याले आहे’ अशी एक जुनी म्हण आहे. त्याप्रमाणे मीही सात नद्यांचे पाणी प्यायले आहे. माझा जन्म मुळा-मुठेच्या काठी पुण्यामध्ये झाला. शिक्षण गोदावरीकाठी नाशिकला झाले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीला यमुनेतिरी जाऊन झाले. मध्यंतरी काही काळ कावेरीची संगत मिळाली आणि गेली 55 वर्षे कृष्णाकाठी सांगलीत स्थिरावले. सांगलीने मला आपलंसं केलं, येथील माणसांनी भरभरून प्रेम देत या मातीत मला रुजवलं. आता येथे माझी मुळे घट्ट झाली आहेत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news