

देवळाली कॅम्प (नाशिक), सुधाकर गोडसे
जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या अमृत महोत्सवाचे लहवितला भक्तीचा मळा फुलणार असून या निमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा एक आढावा.
नाशिक तालुक्यातील आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या श्रीक्षेत्र लहवित येथे येत्या १८ ते २५ डिसेंबरदरम्यान जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीविष्णू महायाग यज्ञ यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संतकुटिया, वाडीचा मळा, श्रीक्षेत्र लहवित येथे होणारा हा सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीचा, वारकरी संप्रदायाच्या वैचारिक परंपरेचा आणि लोकशिक्षणाच्या अखंड प्रवाहाचा गौरव आहे.
डॉ. रामकृष्ण गवळीराम गायकवाड उर्फ महामंडलेश्वर श्रीमहंत विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांचा जन्म १० जून १९५१ रोजी नाशिक येथे झाला. बालपणापासूनच संतसाहित्य, भक्तीपरंपरा व अध्यात्माकडे ओढ असलेल्या महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य साधना, अभ्यास, संशोधन व समाजप्रबोधनासाठी अर्पण केले आहे. त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर विस्तारलेले आहे.
विद्वत्तेचा तपस्वी प्रवास
महाराजांचे शिक्षण हे भक्तीपरंपरा व शास्त्रीय अभ्यास यांचा अद्वितीय संगम आहे. प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती चळवळीचा अभ्यास, पंढरपूर येथे नामवंत संतांकडे चातुर्मासातील अध्ययन, गुजरात, ऋषिकेश, बनारस येथे संस्कृत व वेदांताचे सखोल शिक्षण, तसेच अहमदाबाद व बनारस विद्यापीठातून संस्कृत साहित्य विषयात आचार्य (एम.ए.) पदवी हा त्यांचा वैचारिक पाया आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, येथून पीएच.डी. करताना त्यांनी “संत तुकोबारायांचा लोकसंवाद : तत्त्वज्ञान व काव्यशैली” हे संशोधन संत साहित्यात मैलाचा दगड मानले जाते.
संत तुकाराम आयुष्याचे केंद्रबिंदू
डॉ. रामकृष्णदास महाराजांचे संपूर्ण वैचारिक कार्य संत तुकाराम महाराजांच्या भक्तियोग, सामाजिक समता व लोकाभिमुख तत्त्वज्ञानाभोवती फिरते. 'ओळींची गाथा', 'संत तुकोबारायांचा लोकसंवाद', 'लोकी अलौकिक तुकाराम', 'आयुष्याच्या साधने' यांसारखे संशोधनग्रंथ वाचकांनाही संतविचारांशी जोडणारे आहेत.
राष्ट्रीय सन्मान
संतसाहित्य संशोधनासाठी शासनाचा 'ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार', संत तुकाराम महाराज सेवा पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार, विविध जीवनगौरव पुरस्कार, कुंभमेळ्यात महामंडलेश्वर व श्रीमहंत या पदवीने विभूषित होणे, हे त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. पुणे विद्यापीठाच्या 'संत तुकाराम महाराज अध्यासन' चे प्रमुख म्हणून त्यांनी शैक्षणिक पातळीवरही वारकरी विचारांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
अमृत महोत्सव एका युगपुरुषाचा गौरव
डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांचा अमृत महोत्सव म्हणजे केवळ वयपूर्तीचा सोहळा नसून, भक्ती, ज्ञान, सेवा आणि सामाजिक परिवर्तनाच्या सहा दशकांच्या तपश्चर्येचा गौरव आहे. अखंड हरिनाम सप्ताह व श्रीविष्णू महायाग यज्ञाच्या माध्यमातून समस्त विश्वकल्याण व विश्वशांतीचा संकल्प या सोहळ्यातून व्यक्त होणार आहे.