

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चारवर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय ऊर्फ शेखर संजय खैरनार (२४) याला फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी २०४ पानी निकालाचे वाचन करून हा निर्णय जाहीर केला. लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा, तर अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. आरोपीला निकालाविरुद्ध ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मुभा असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घराबाहेर खेळत असलेली चारवर्षीय बालिका अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तिचा शोध घेतला. दरम्यान, शाळेजवळील मोबाइल टॉवर परिसरातील झाडाझुडपांत तिचा मृतदेह आढळला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे तपासातून समोर आले. या अमानुष घटनेने डोंगराळे गावासह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी सर्व स्तरांतून करण्यात आली होती.
याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी विजय ऊर्फ शेखर संजय खैरनारला अटक केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वैद्यकीय, डीएनए, न्यायवैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले होते. घटनेनंतर सुमारे तीन आठवड्यांत ४२५ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
या खटल्यासाठी राज्य सरकारने प्रख्यात विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. अॅड. निकम यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडलीन्यायालय परिसरात गर्दी; कडेकोट बंदोबस्त
न्यायालय परिसरात गर्दी; कडेकोट बंदोबस्त
निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे निकाल जाहीर झाला, त्यावेळी न्यायालयात उपस्थित होते.