

ठळक मुद्दे
बचत गटामुळे महिलांच्या हाताला रोजगार मिळाला असून, कुटुंबाच्या अर्थचक्राला चालना
विविध वस्तू, फराळ हा ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने चांगली मागणी
दिवाळीच्या प्रकाशात महिलांचा आत्मविश्वास उजळला
नाशिक : भूमिका वाघ
जिल्ह्यातील सुमारे २५० महिला बचत गटांमध्ये १५०० हून अधिक महिला दिवाळी फराळ, पणत्या आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्याचे काम करत आहेत. यामुळे त्यांच्या हाताला रोजगार मिळाला असून, अनेक कुटुंबाच्या अर्थचक्राला चालना मिळाली आहे. फराळ, कलाकुसरीच्या पणत्या व सजावटीच्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने त्यांना चांगली मागणीही येत आहे.
सुवर्णा कदम, प्रिया शिंदे, मीनल पाटील आणि वंदना गावित यांच्या श्री लक्ष्मी महिला बचत गटाने हाताने रंगवलेल्या पणत्या आणि रांगेळ्या बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या कलाकुसरीला चांगली मागणी असून, विक्रीत दरवर्षी वाढ होत आहे. दिवाळीच्या प्रकाशात या महिलांचा आत्मविश्वासही उजळला आहे. त्यांच्या परिश्रमातून तयार झालेला हा सण केवळ आनंदाचा नाही, तर स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित करणारा ठरत आहे.
दिवाळीचा सण जवळ आला की बाजारपेठा उजळतात, पण यंदा नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या हातांनीच तो उजेड अधिक अर्थपूर्ण झाला आहे. पारंपरिक पणत्या, आकर्षक सजावटीच्या वस्तू आणि घरगुती फराळ तयार करून या महिलांनी स्वतःसाठी उत्पन्नाचे नवे दरवाजे उघडले आहेत.
महिला बचत गटांच्या पणत्या सुंदर आणि टिकाऊ असतात, त्यामुळे दरवर्षी मी इथूनच खरेदी करते.
रेणुका देशमुख, ग्राहक
दिवाळीत स्थानिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्याने त्यांच्या प्रगतीत आपलाही वाटा उचलला जातो.
अमोल जगताप, ग्राहक