

नाशिक : पूर्वा गोर्डे
दीपोत्सव केवळ भारतातच नाही, तर जगभरात विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होते. हजारो किलोमीटर दूर असूनही, भारतीय नागरिक परंपरा जपत परदेशी भूमीवर 'घरच्या' दिवाळीचा अनुभव घेत आहेत. जर्मनीत मागील सहा वर्षांपासून स्थायिक मराठी व्यक्ती अभिषेक भंडारे उत्साहात दिवाळी साजरी करतात.
दिवाळी म्हणजे 'घरभर प्रकाश, आवाज, कुटुंब आणि गोडधोड'. पण, जर्मनीमध्ये ही 'उब थोडी कमी जाणवते. परदेशात दिवाळीला सुट्टी मिळत नाही, त्यामुळे एक दिवसाची रजा घेऊन मी हा सण साजरा करतो. थोडाफार फराळ बनवतो. घरात दिवे आणि सजावट करतो. रांगोळी आणि दिवे मिळवण्यासाठी थोडी अडचण येते, पण ऑनलाईन ऑर्डर करून ती अडचण दूर होते, असे भंडारे सांगतात.
दिवाळी दरम्यान जर्मनीतील भारतीय समुदाय एकत्र येतो. पूजा, नाच, गाणी आणि जेवणासोबत लहानसा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. जर्मनीत फटाके फोडण्यास कायदेशीर मर्यादा आहेत. 'त्यामुळे आम्ही फक्त दिवे आणि मेणबत्त्या लावून हा सण साजरा करतो,' असेही भंडारे सांगतात.